Maharashtra Election 2019 : मतदार वाढले, पण मतदानाचा टक्का वाढणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 01:11 AM2019-10-21T01:11:44+5:302019-10-21T06:39:17+5:30

Maharashtra Election 2019 : ठाण्यातील चार मतदारसंघांमध्ये ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात

Voters increase, but will the voting percentage increase? | Maharashtra Election 2019 : मतदार वाढले, पण मतदानाचा टक्का वाढणार का?

Maharashtra Election 2019 : मतदार वाढले, पण मतदानाचा टक्का वाढणार का?

Next

ठाणे : ठाण्यातील चारपैकी दोन मतदारसंघ शिवसेनेकडे आणि भाजप आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात प्रत्येकी एक आहे. मागील निवडणुकीत या चारपैकी ठाणे शहर मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ५६.५६ टक्के, कोपरी-पाचपाखाडीत ५३.१०, ओवळा -माजिवडा ५०.३१ आणि मुंब्रा -कळवा मतदारसंघात ४७.४८ टक्के मतदानाची नोंद झाली होती. यावेळी चारही मतदारसंघांत मतदारांची संख्या वाढलेली आहे. वाढलेल्या मतदारांमुळे मतदानाचा टक्का वाढणार का? आणि त्याचा फायदा कोणाला होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यंदा महायुती आणि आघाडी एकत्र लढत आहेत. त्यामुळे या चारही मतदारसंघांत सर्वाधिक मतांनी कोण निवडून येणार, यासाठी चुरस लागली आहे.

ठाणे शहर मतदारसंघात खरी लढत भाजप आणि मनसेमध्ये

ठाणे शहर मतदारसंघात पाच उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी येथे खरी लढत ही भाजपचे विरुद्ध मनसे यांच्यात आहे. मागील निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे वेगळे लढले होते. त्यामुळे मतांचे विभाजन झाले होते. यंदा मात्र या दोघांची युती झाली आहे. मागील निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोघेही वेगळे लढले होते. आता मात्र या दोघांनी माघार घेतली आहे. २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत येथे ५१.५३ टक्के, तर २०१४ च्या निवडणुकीत येथे ५६.५६ टक्के मतदानाची नोंद झाली होती. २००९ च्या तुलनेत येथे ५.०३ टक्के मतांची वाढ झाली होती. २०१४ मध्ये एकूण तीन लाख २२ हजार १६८ मतदारांपैकी एक लाख ८२ हजार २३३ मतदात्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यापैकी ८२ हजार ८०६ पुरुष आणि ९९ हजार ४२७ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. विशेष म्हणजे पुरुष मतदात्यांच्या तुलनेत १६ हजार ६२१ अधिक महिलांनी मतदान केले होते. त्यामुळे ठाणे शहर मतदारसंघाचा निकाल स्त्री मतदारांच्या हाती होता. यंदा या मतदारांची संख्या तीन लाख ३७ हजार ९०९ एवढी असून यामध्ये एक लाख ७७ हजार १५४ पुरुष आणि एक लाख ५८ हजार ७२१ स्त्री मतदार आहेत.

कोपरी-पाचपाखाडीत शिवसेना, मनसे आणि काँग्रेसची लढत

कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. येथे ११ उमेदवार रिंगणात आहेत. खरी लढत ही शिवसेना विरुद्ध मनसे आणि काँग्रेस यांच्यात होणार आहे. २००९ मध्ये येथे ५०.९५ टक्के, तर २०१४ मध्ये ५३.१० टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यानुसार, २.१५ टक्के मतदानाची वाढ झाली होती. २०१४ मध्ये तीन लाख ४७ हजार ३८३ मतदार होते. यापैकी एक लाख ८४ हजार ४६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एक लाख ४० हजार ३४ पुरुष आणि ८० हजार ४३३ स्त्री मतदारांनी मतदान केले होते. यंदा येथे तीन लाख ५२ हजार ८५८ मतदार आहेत.

मुंब्रा-कळवा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना

मुंब्रा-कळवा मतदारसंघात ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून खरी लढत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना यांच्यात आहे. २००९ मध्ये येथे ४७ टक्के, तर २०१४ मध्ये ४७.४८ टक्के मतदानाची नोंद झाली होती. समाजवादी, एमआयएम या निवडणुकीतून बाहेर आहे. मागील निवडणुकीत तीन लाख ४८ हजार ४११ मतदात्यांपैकी एक लाख ६५ हजार ४२७ मतदात्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यापैकी ९२ हजार ४५५ पुरुष आणि ७२ हजार ९७२ स्त्री मतदारांनी येथे मतदान केले होते. यंदा तीन लाख ५७ हजार ४९३ मतदार आहेत.

२0१४ मध्ये होती पाच टक्क्यांची वाढ

२०१४ च्या निवडणुकीत या चारही मतदारसंघांत मतदानाच्या टक्केवारीत दोन ते पाच टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. आता मागील वेळेच्या तुलनेत मतदारांची संख्यादेखील वाढली असल्याने मतदानाची टक्केवारी वाढणार का, हे पाहणे यानिमित्ताने महत्त्वाचे ठरणार आहे.

ओवळा-माजिवड्यात शिवसेना विरुद्ध काँग्रेस आणि मनसे लढत

ओवळा-माजिवडा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचा निसटता विजय झाला होता. यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती आहे. या मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणात असून खरी लढत ही शिवसेना, काँग्रेस आणि मनसे यांच्यात होणार आहे. या मतदारसंघात २००९ मध्ये ४६.८३ टक्के मतदानाची नोंद झाली होती. २०१४ मध्ये त्यात ३.४८ टक्के वाढ होऊन ५०.३१ टक्के मतदान झाले होते. आता या मतदारसंघात एकूण चार लाख ४९ हजार ६०२ मतदार आहेत. मागील वेळेच्या तुलनेत येथे मतदारांची संख्या ही ७९ हजार २११ ने वाढली आहे.

Web Title: Voters increase, but will the voting percentage increase?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.