ठाणे : जिल्ह्यातील ६५ लाख मतदारांच्या मतदानासाठी सहा हजार ५९२ मतदान केंद्राचीं व्यवस्था करण्यात आलेली आहे. यापैकी सर्वाधिक पाच हजार ११६ मतदान केंद्र इमारतींमध्ये आहेत. तर ठिकठिकाणी असलेल्या पत्राच्या, प्लायबोर्डच्या पार्टीशनच्या असलेल्या पार्टीशनच्या खोल्यांमध्ये तब्बल ८०७ मतदान केंद्र यंदाच्या निवडणुकीसाठी निश्चित करण्यात आलेले आहे. तर मंडपात ६३३ मतदान केंद्र असून गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये यंदा ३६ मतदान केंद्राची व्यवस्था निवडणूक विभागाने केल्याचे उघड झाले आहे.
जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लाेकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान २० मे राेजी पार पडणार आहे त्यासाठी सहा हजार ५९२ मतदान केंद्रांची व्यवस्था निवडणूक आयाेगाने केली आहे. यामध्ये आधीचे म्हणजे मुळचे मतदान केंद्र पाच हजार ५२४ आहेत. तर सहाय्यकारी ६८ मतदान केंद्र ठिकठिकाणी निश्चित केले आहे. जिल्ह्याभरातील १८ विधानसभा मतदारसंघात या मतदान केंद्रांचे नियाेजन करण्यात आलेले आहे. त्यात तब्बल पार्टीशनच्या खाेल्यांमध्ये ८०७ मतदान केंद्रांचा समावेश असल्याचे निदर्शनात आले आहे. या खाेल्यांसह शासकीय इमारती, शाळा नसलेल्या ठिकाणी तब्बल ६३३ मंडप टाकून त्यांत मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील या १८ विधानसभापैकी प्रत्येक लाेकसभा मतदारसंघात सहा विधानसभांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यातील ६५ लाख एक हजार ६७१ मतदार त्यांच्या जवळच्या मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत. जिल्ह्याभरातील एक हजार ९३१ ठिकाणी या सहा हजार ५९२ मतदान केंद्रांची व्यवस्घ्था करण्यात आलेली आहे. त्यामध्ये सहाय्यकारी ६८ मतदान केंद्रांसह २२ महिला मतदान केंद्रांचाही समावेश आहे. याशिवाय १८ दिव्यांग मतदान केंद्र असून एक युवा मतदान केंद्र आणि सहा संवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश आहे.