मीरा रोड : लोकसभा निवडणुकीसाठी उद्या, सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने मतदानाची वेळ ठरवून दिली असताना, ओवळा-माजिवडा मतदारसंघातील अनेक भागांत मतदारांना दिलेल्या मतदार ओळखचिठ्ठीत मतदानाची वेळ चक्क सकाळी ७ पासून रात्री ११ वाजेपर्यंतची छापण्यात आली आहे. यामुळे मतदारांमध्ये गोंधळ उडाला आहे.
सोमवारी लोकसभा निवडणुकीकरिता मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत निश्चित केली आहे. परंतु, ठाणे लोकसभा मतदारसंघातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातल्या अनेक मतदारांचा आयोगाकडून वितरित केल्या जाणाऱ्या मतदार ओळखचिठ्ठ्यांनी वेळेबाबत गोंधळ निर्माण केला आहे. त्यामध्ये मतदानाची वेळ ही सकाळी ७ ते चक्क रात्री ११ पर्यंत छापली आहे. बोधराम कडेदिन शुक्ला, साधना जितेंद्र दीक्षित, रमेश माताप्रसाद मिश्रा व नीरज अशोक दीक्षित आदी मतदारांना मिळालेल्या ओळखचिठ्ठीत रात्री ११ पर्यंतची वेळ छापली आहे. यांचे मतदानकेंद्र भाईंदरच्या अभिनव शाळेत आहे. अशा असंख्य मतदारांना मिळालेल्या ओळखचिठ्ठ्यांमध्ये चुकीची वेळ टाकली आहे. मतदानाची वेळ रात्री ११ पर्यंतची असल्याचे छापून आल्याने अनेक मतदारांनी ही वेळ विचारात घेतल्यास त्यांना मतदानापासून मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांनी एकाच भागात हा प्रकार झाल्याचे मान्य करत सुधारित चिठ्ठ्या छापून मतदारांना देण्यात आल्याचा दावा करण्यात आला असला, तरी अनेक मतदारांनी आपणास सुधारित मतदारचिठ्ठी मिळाली नसल्याचे सांगितले. ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील एका भागाच्या मतदार ओळखचिठ्ठ्या डाउनलोड करताना अशी चूक झाली होती. ती निदर्शनास येताच दुरुस्त करून सुधारित चिठ्ठ्या प्रिंट करण्यात आल्या आहेत. त्यांचे वाटप मतदारांना केले आहे. - अपर्णा सोमाणी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे