लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यातील १५८ पैकी १४३ ग्रामपंचायतींच्या ९९४ सदस्यांसाठी दोन हजार ४१३ उमेदवारांसाठी आज, शुक्रवारी गावपाड्यातील तीन लाख मतदार मतदान करणार आहेत. त्यासाठी ४७९ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. या १४३ ग्रामपंचायती भिवंडी, कल्याण, अंबरनाथ मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील आहेत. त्या एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या आहेत. यात १५८ ग्रामपंचायतींच्या एक हजार ४७२ सदस्यांसाठी निवडणुका हाती घेतल्या होत्या. त्यासाठी चार हजार ३८८ जणांनी उमेदवारी दाखल केली होती. यापैकी आठ ग्रामपंचायतींसह ४१८ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित ९९६ सदस्यांच्या १४३ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान आहे.
मतदानासाठी निश्चित केलेल्या ४७९ मतदान केंद्रांवर तब्बल दोन हजार ९०० अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी तैनात आहेत. यामध्ये एक जनसंपर्क अधिकारी, तीन मतदानकेंद्र अधिकारी, शिपाई आणि सुरक्षेसाठी पोलीस, आदी सहाजणांचे पथक तैनात झाले आहेत.
काही ग्रामपंचायतींमध्ये बहिष्कारजिल्ह्यातील १५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या; पण यातील ठाणे तालुक्यातील नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या १४ गावांच्या पाच ग्रामपंचायतींसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. या ग्रामपंचायतींच्या ५१ सदस्यांसाठी ही निवडणूक होणार होती. या गावांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यामुळे आता या पाच ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार नाही. याशिवाय आठ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे या सर्व ग्रामपंचायती निवडणूक प्रक्रियेतून वगळण्यात आल्या आहेत. उर्वरित जागांसाठी रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांचा फैसला उद्या, शुक्रवारी होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी मतदानासाठी यंत्रणा केंद्रांवर हजर झालेली आहे. सकाळी दिलेल्या वेळेत मतदान प्रक्रिया सुरू होईल. मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात असून मतदान यंत्रेही उपलब्ध आहेत. गरज भासल्यास जादा मनुष्यबळ, मतदानयंत्रे उपलब्ध ठेवली आहेत. वाहन व्यवस्था स्थानिक तहसीलदारांच्या यंत्रणेने उपलब्ध केलेली आहे. - राजेंद्र तवटे, तहसीलदार, सामान्य विभाग, ठाणे
पोलीस बंदोबस्तमतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे ग्रामीणसह ठाणे शहर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. यामध्ये ग्रामीण परिक्षेत्रात पाच उपअधीक्षकांसह दीड हजार, तर ठाणे शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पोलीस उपायुक्तांसह एक हजार असा सुमारे अडीच ते तीन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षताकोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानासाठी रांगा लावताना सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांना मतदानापासून वंचित ठेवता येत नाही. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बहाल करण्याच्या दृष्टीने शेवटचा अर्धा तास ठेवण्यात आला आहे.
सोमवारी निकालग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवार, १८ जानेवारी रोजी जाहीर होणार आहेत. त्यादृष्टीने बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.