कल्याण : राज्य निवडणूक आयोगातर्फे निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीन सोबत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. परंतु, त्यावर मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी आक्षेप घेतला आहे. व्हीव्हीपॅट ही यंत्रणा खर्चिक व धोकादायक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. यासंदर्भात आयोगाला पत्र पाठवून शेख यांनी काही सवाल केले आहेत.
सध्या जिल्हास्तरावर निवडणूक आयोगातर्फे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट जनजागृती केली जात आहे. मात्र, व्हीव्हीपॅट ही यंत्रणा जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीला हे आव्हानच असल्याचे शेख यांनी आयोगाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. सर्व धोक्यापासून ही यंत्रणामुक्त वाटत असलीतरी त्यानंतरच्या प्रक्रिया ज्या निवडणुकांदरम्यान होणार आहेत, त्या अत्यंत धोकादायक वाटत असल्याचे शेख यांचे म्हणणे आहे. कार्यपद्धत व यंत्रणा खर्चिक बाब असून त्यापेक्षा मतपत्रिकांवरील निवडणुका २० टक्के खर्चात झाल्या असत्या, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. याचबरोबर ईव्हीएम मशीनवर चिन्हांच्या प्रतिकिृतीचा कागद लावला जातो परंतु, या चिन्हांचे व्हीव्हीपॅटद्वारा नियंत्रण करायचे झाल्यास या मशीनमध्ये चिन्हांचे लोडिंग कसे करणार, प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळ्या चिन्हांचे लोडिंग होणार का, सिम्बॉल लोडींग निवडणूक आयोगाचे तंत्रज्ञ, करणार की खाजगी तंत्रज्ञ की उत्पादक कंपनी करणार, त्यासाठी सॉप्टवेअर अॅप्लिकेशन तयार कोण करणार, सिम्बॉल लोडिंग करताना विशिष्ट चिन्हाला आगाऊ १०० ते २०० मते लोड केली जाण्याची शक्यता आहे का, लाखो व्हीव्हीपॅट मशीनमध्ये लोडिंगसाठीची यंत्रणा निवडणूकआयोग, कशी अंमलात आणणार, सिम्बॉल लोडिंगच्या प्रक्रियेचा सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित हवे ही गोष्ट अव्यवहार्य आहे, ती कशी राबविणार, व्हीव्हीपॅटचा वापर गृहीत धरला तरी आयोग या चिन्हांची मोजणी करणार नाही का? त्या चिन्हाचा वापर फक्त चिन्ह पाहण्यासाठी होणार का, चिठ्ठ्या मोजायच्या असल्यास न्यायालयाकडून आदेश घ्यावा लागणार का, त्याची प्रक्रिया कशी होणार, असे सवाल शेख यांनी केले आहेत. आता यावर निवडणूक आयोग काय उत्तर देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.