२०० हुन अधिक दिवस मधाई पाल तरुण चालवतोय सायकल
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या पाहता वाहतूक नियमांविषयी पश्चिम बंगाल येथील सिलिगुडी येथून आलेला सायकलिस्ट हा २०० हून अधिक दिवस भारत भ्रमण करीत आहे. सायकलिंग केल्याने माणूस फिट राहतो तसेच, प्रदूषण तर टाळता येते आणि वाहतूककोंडीही टाळता येते, असा संदेश तो भारतभ्रमणादरम्यान नागरिकांना देत आहे. मधाई पाल असे या तरुणाचे नाव आहे.
दिवसेंदिवस रस्त्यांवरील अपघातांची संख्या वाढत आहे. सरकार त्यांच्या परीने जागृती करण्याचा प्रयत्न करीत असली तरी नागरिक म्हणून आपलेदेखील वाहतूक नियम पाळणे गरजेचे आहे. स्व सुरक्षा बरोबर इतरांचाही जीव वाचविण्यासाठी वाहतूक नियम पाळा, असा संदेश देण्यासाठी पाल हा १ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ६ वाजता पश्चिम बंगाल येथील सिलिगुडी येथील आपल्या घरातून भारतभ्रमणसाठी निघाला आहे. पश्चिम बंगालहून सुरुवात करून ओडिसा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, गोवा, कर्नाटक, केल्यानंतर पाल हा तरुण दोन दिवसांपूर्वी ठाण्यात पोहचला. शुक्रवारी ठाण्यात आल्यावर अनेक ठाणेकरांनी त्याच्यासोबत सेल्फी काढले. सागर साळवी या तरुणाने नौपाडा येथे पाल दिसल्यावर त्याला थांबविले. त्याचा पुढचा प्रवास गुजरात, राजस्थान, पंजाब, काश्मीर तसेच भारतातील सर्व राज्य पूर्ण करून पुन्हा तो त्याच्या राज्यात जाणार आहे. सायकलपुढे तिरंगा तर मागे समान घेऊन तो सायकल चालवतो. सकाळी ६ ते सायंकाळी ६ यादरम्यान तो सायकल चालवितो.
--------------------
- सध्या वाहतूककोंडी आणि त्याचबरोबर प्रदूषणदेखील वाढत आहे. त्यामुळे सायकल चालवून आपण या दोन्ही समस्या सोडवू शकतो असे पाल याने सांगितले.
- तरुण पिढी व्यायामासाठी जिमला जाते. तसेच, थोड्या थोड्या अंतरावर गाडीचा वापर करतात. परंतु, सायकल चालविण्याची त्यांनी सवय करावी याने फिटदेखील ते राहतील आणि इंधन बचत होईल, असेही पाल म्हणाला.
......
* सायकल चालवित असताना या यात्रेमध्ये अनेक अडचणी येत आहेत. पण या अडचणींवर मात करून फक्त स्वतःच्या सायकलिंगवर लक्ष्य केंद्रित करून भारत भ्रमण करीत आहे.
- मधाई पाल
-------------