भिवंडी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मनमानी व बेजबाबदार कामामुळे भिवंडी-वाडा-मनोर महामार्ग खड्ड्यांत गेला आहे. याविरोधात मंगळवारी श्रमजीवी संघटनेने दणका दिला. अंबाडीनाक्यासह पूर्ण महामार्गावर १३ ठिकाणी श्रमजीवी संघटनेने रास्ता रोको आंदोलन करून भरपावसात तीन तास हा रस्ता रोखून धरला होता. या आंदाेलनानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
दोन वर्षांपूर्वी श्रमजीवी संघटनेचे युवानेते जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पवार यांनी डॉ. नेहा शेख यांच्या अपघाती मृत्यूनंतर टोलनाका तातडीने बंद पाडला होता. त्यानंतर या रस्त्याची पूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची होती. नेहमीच ठेकेदार पोसणाऱ्या या विभागाने कोट्यवधी रुपये खर्च करून फक्त अपहार केला असल्याने या रस्त्याची पुरती दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांसह वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. भिवंडी तालुक्यातील कवाड, अनगाव, पालखणे, वारेट, दुगाड, अंबाडी, दिघाशी फाटा यांसह वाडा तालुक्यातील प्रमुख ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले.
अंबाडीनाक्यावर पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदाेलन झाले. श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, कार्याध्यक्ष स्नेहा दुबे, सरचिटणीस बाळाराम भोईर, विजय जाधव, जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, अशोक सापटे, पवार आदी श्रमजीवीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी भेटी देत आंदोलकांना पाठिंबा दिला.