लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ऐन गर्दीच्या वेळी सकाळी आणि सायंकाळी पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी येथे अरुंद रेल्वेपुलाच्या कामामुळे नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. हा त्रास कमी व्हावा तसेच या पुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी बुधवारी या पुलाच्या कामासंदर्भात असणाऱ्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.
या दौऱ्यात ठाण्याच्या उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, स्थानिक नगरसेविका मालती रमाकांत पाटील तसेच मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे अभियंता सुर्वे, रेल्वेचे व्यवस्थापकीय अधिकारी, सल्लागार, ठेकेदार तसेच इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
पाहणी करण्यापूर्वी विचारे यांनी सर्व कामांचा आढावा अधिकाऱ्यांकडून घेतला. त्यामध्ये पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुंबई व ठाण्याच्या दिशेस असणाऱ्या लेनचे काम एमएमआरडीएमार्फत सुरू आहे. तसेच रेल्वेपुलावरील काम रेल्वेमार्फत सुरू आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुलाचे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काँक्रीटचे काम पूर्ण करून हा रस्ता वाहतुकीसाठी सज्ज करण्यात येणार आहे. २० जुलै २०२१ पालघर येथील बोईसर येथे गर्डरच्या कामाची पाहणी केली होती. तेथील सर्व गर्डर कोपरी येथे आणण्यात आलेले आहेत व पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित गर्डर बसविण्याचे काम येत्या नऊ महिन्यांत पूर्ण होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वर्षभरात या पुलाचे काम पूर्ण करून याचे लोकार्पण करण्यात येईल, अशी माहिती विचारे यांनी दिली.
-----------------