डोंबिवली : कल्याण-शीळ-तळोजा रस्त्याला पर्यायी तळोजा एमआयडीसी उसाटणे-बदलापूर पाइपलाइन रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या डागडुजीचा अहवाल एमएमआरडीएने मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळताच या कामाला सुरुवात करण्याची ग्वाही एमएमआरडीए आयुक्त यूपीएस मदान यांनी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांना नुकत्याच झालेल्या बैठकीत दिली. त्याचबरोबर शहाड जंक्शन येथील ३०० कोटींचे काम हाती घेण्यात येणार आहे.कल्याण-शीळ-तळोजा रस्त्यावर अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर कोंडी होते. त्यामुळे बदलापूर पाइपलाइन-उसाटणे-तळोजा एमआयडीसी हा रस्ता त्याला चांगला पर्याय आहे. मात्र, काही दिवसांपासून या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शिंदे यांनी एमएमआरडीए आणि मुख्यमंत्र्यांकडेही पत्राद्वारे मागणी केली होती.मदान यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या एका बैठकीत कल्याण-मुरबाड, कल्याण-बदलापूर आणि कल्याण-पुणे लिंक रोड या तीन महत्त्वाच्या रस्त्यांच्या जंक्शनवर (वाय जंक्शन) उड्डाणपूल उभारण्याबाबतही चर्चा झाली. त्यानुसार, केडीएमसीने या उड्डाणपुलासाठी २९० कोटींचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून एमएमआरडीएला सादर केला आहे. हा अहवालही लवकरच मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी सादर करण्याचे आश्वासनही मदान यांनी दिले आहे.>१० गावांमधील रस्त्यांची होणार दुरुस्तीकेडीएसीच्या हद्दीतील १० गावांमध्ये एमएमआरडीए ग्रोथ सेंटर विकसित करत आहे. मात्र, सध्या या गावांमधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या गावांमध्ये तातडीने रस्त्यांची कामे हाती घेण्याची मागणी खासदार शिंदे यांनी एमएमआरडीएकडे केली होती. त्यानुसार, याबाबतच्या प्रस्तावाला एमएमआरडीएने मान्यता दिली असून तो अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा, तळोजा-बदलापूर पाइपलाइन रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 3:25 AM