डोंबिवली : शहराला पाइपद्वारे गॅसपुरवठा करण्यासाठी गॅसवाहिनी टाकण्याचे काम घरडा सर्कलनजीकच्या एमआयडीसीच्या टाकीपर्यंत पूर्ण झाले आहे. घरडा सर्कल ते मंजुनाथ शाळा आणि मंजुनाथ शाळा ते डोंबिवली रेल्वेमार्ग अशा दोन्ही रस्त्यांच्या कडेने गॅसवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी महानगर गॅस कंपनीने ६ मार्च २०१७ ला केडीएमसीकडे अर्जाद्वारे केली होती. पण, कंपनीला एकच परवानगी मिळाली आहे. त्यामुळे गॅसवाहिनी टाकण्याचे काम खोळंबले आहे. परिणामी, नागरिकांना पाइपगॅससाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
केडीएमसीच्या या आडमुठ्या धोरणाबाबत शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रफुल्ल देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, केडीएमसीने दुसऱ्या टप्प्यातील मंजुनाथ शाळा ते रेल्वेमार्गापर्यंतच्या रस्त्यात गॅसवाहिनी टाकण्यासाठी परवानगी दिली आहे. परंतु, पहिल्या टप्प्यातील घरडा सर्कल ते मंजुनाथ शाळा रस्त्यापर्यंतचे काम करण्यासाठी कंपनीला पैसे भरण्यासाठी ५३,०२,५१८ रुपयांची डिमांड नोट १४ फेब्रुवारी २०१८ ला दिली. त्यानुसार, कंपनीने ही रक्कम ४ एप्रिल २०१८ ला केडीएमसीकडे भरली. पण, पैसे भरूनही केडीएमसीने कंपनीला घरडा सर्कल ते मंजुनाथ शाळा हे काम सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली नाही.
देशमुख पुढे म्हणाले की, साधारणत: मे महिन्यानंतर म्हणजे पावसाळ्यात रस्त्यावर खोदकामे करण्यास केडीएमसी मनाई करते. आता फेब्रुवारी निम्मा उलटला आहे. महापालिकेने तत्काळ परवानगी दिल्यास मे अखेरपर्यंत हे काम डोंबिवली स्थानकापर्यंत (गणपती मंदिरासमोरील उद्यानाच्या बाजूपर्यंत) पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही गॅस कंपनीने दिली आहे. गॅसवाहिनी टाकण्यासाठी कोणताच रस्ता पूर्णपणे खोदण्याची गरज नाही. केवळ रस्त्याच्या कडेने टाकलेले पेव्हरब्लॉक खोदून गॅसवाहिनी टाकायची आहे. त्यासाठी अशी अडवणूक केडीएमसीच्या अधिकाºयांनी करण्याची गरज नाही. केडीएमसीच्या आडमुठ्या धोरणामुळे नागरिकांना पाइपगॅससाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.डोंबिवलीतील मंजुनाथ शाळा ते टिळक पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे तो गॅसवाहिनीसाठी खोदण्यास केडीएमसीने परवानगी दिलेली नाही. त्याऐवजी महानगर गॅसला पाथर्लीतून गॅसवाहिनी टाकण्याचा पर्याय सुचवला आहे.- सुनील जोशी,उपायुक्त, केडीएमसी