कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन समितीच्या सहा सदस्यांची निवडणूक चुरशीची झाली असताना आता परिवहन सभापतीपदाच्या निवडणुकीची प्रतीक्षा लागली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची नियुक्ती कोकण विभागीय आयुक्तांनी केली आहे. परंतु, निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. दरम्यान, काही दिवसांत ही निवडणूक झाली, तरी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नव्या सभापतींचे कामकाज सुरू व्हायला जून उजाडणार आहे.नितीन मट्या पाटील, राजेंद्र दीक्षित, संतोष चव्हाण, प्रल्हाद म्हात्रे, सुभाष म्हस्के, शैलेंद्र भोईर हे सहा सदस्य मुदत संपल्याने २८ फेब्रुवारीला निवृत्त झाले. रिक्त जागांसाठी १५ फेब्रुवारीला निवडणूक घेण्यात आली. यात शिवसेनेचे सुनील खारूक, अनिल पिंगळे, बंडू पाटील, तर भाजपाचे संजय मोरे, स्वप्नील काठे, दिनेश गोर हे निवडून आले. भाजपाचे गोर आणि मनसेचे मिलिंद म्हात्रे यांना समसमान मते मिळाल्यानंतर गोर यांची महापौर विनीता राणे यांच्या निर्णायक मतामुळे समितीवर वर्णी लागली.निवडणुकीनंतरचे समितीमधील पक्षीय बलाबल पाहता शिवसेनेचे आणि भाजपाचे प्रत्येकी सहा सदस्य आहेत. स्थायी समिती सभापती हा परिवहन समितीचा पदसिद्ध सदस्य असतो. हे पद सध्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे सेनेचे सध्या सात सदस्य समितीत आहेत. सभापतीपदाची टर्म आता शिवसेनेची आहे. शिवसेनेचे संजय पावशे यांनी याआधी सभापतीपद भूषवल्याने मनोज चौधरी, मधुकर यशवंतराव, सुनील खारूक, अनिल पिंगळे, बंडू पाटील यांच्यापैकी कोणाला सभापतीपदाची संधी मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे कामकाजाला कालावधी कमीसध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. मतमोजणी २३ मे रोजी आहे. सध्या परिवहन सभापतीपदाची निवडणूक झाली, तरी नव्या सभापतींना २३ मे नंतर जेव्हा आचारसंहिता संपुष्टात येईल, तेव्हाच कामकाज करता येईल.त्यानंतर, चार महिन्यांतच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे तेव्हाही समितीचे कामकाज चालणार नाही. त्यामुळे नव्या सभापतींना सध्याच्या लोकसभा व विधानसभा आचारसंहितेचाही चांगलाच फटका बसणार आहे.
परिवहन सभापतीपदाच्या निवडणुकीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:18 AM