पंकज पाटील अंबरनाथ : अंबरनाथ येथील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा एकमेव उड्डाणपूलावरील रस्ता दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहे. लोकसभा निवडणुका झाल्यावर या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र पावसाळा सुरू झाल्याने ते काम करता आले नाही. त्यानंतर लागलीच विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्याने पुन्हा हे काम रखडले. आता आचारसंहिता संपल्यावर तरी किमान रस्ता दुरूस्ती सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र अजूनही हे काम सुरू न झाल्याने धोकादायक झालेल्या रस्त्याचा वापर नागरिकांना करावा लागत आहे.
अंबरनाथमधील काँक्रिटच्या रस्त्यांची चर्चा शहरभर असली तरी आता पाच महिन्यांपासून एकाच रस्त्याची चर्चा रंगली आहे. अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा उड्डाणपूल आणि त्यावरील रस्ता हा गंभीर विषय झाला आहे. पावसात हा रस्ता पूर्ण खचला. हा रस्ता पालिकेसाठी आणि सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे. याच उड्डाणपुलाच्या रस्त्यावरुन राजकीय वादही निवडणूक काळात रंगला होता. असे असतानाही या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी विलंब होत आहे. मूळात या रस्त्याची दुरूस्ती करण्यासाठी पालिकेने निधी मंजूर केला आहे. सोबत या रस्त्याचे काम करण्याचे आदेशही कंत्राटदाराला मे महिन्यातच दिले आहे. मात्र मे महिन्यानंतर लागलीच पावसाळा येत असल्याने या रस्त्याचे काम करण्यसाठी वाहतूक विभागाची परवानगी मिळण्यास विलंब झाला. पावसात रस्ता करणे शक्य नसल्याने पुन्हा हा रस्ता रखडला. या आधीही मार्च महिन्यात या रस्त्याचे काम लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकला होता. आता त्यातून सुटका झाल्यावर पावसामुळे हा रस्ता अडकला. पावसातून सुटका होत नाही तो पुन्हा विधानसभेच्या आचारसंहितेत हा रस्ता पुन्हा अडकला. आचारसंहिता आणि पाऊस अशा दुहेरी कात्रीत हा रस्ता सापडल्याने या रस्त्याची वाताहात झाली. या रस्त्यावरील डांबरी थर निघून तो रस्ता आता पुलाच्या काँक्रिटच्या थरावर आला आहे. त्यातच पुलाचे खांब ज्या लोखंडी पट्टीने जोडले जातात तो जोडही कमकुवत झाला आहे. त्यामुळे या पुलाची तत्काळ दुरूस्ती करण्याची गरज आहे. रस्त्यावरील डांबरी भाग निघाल्याने जड वाहतुकीच्या गाड्या या पुलाला धोका निर्माण करू शकतात. त्यातच हा पूल ज्या भागात उभा आहे त्या भागातील नागरिकांनी पुलाच्या कॉलमभोवती अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पुलाचे कॉलम सुरक्षित आहेत की नाही याची शाश्वती राहिलेली नाही. या पुलाच्या कॉलमला संरक्षक थर उभारण्याची गरज या आधीच व्यक्त करण्यात आली आहे. मात्र ते कामही अजून सुरु झालेले नाही. उड्डाणपुलाची अवस्था पाहिल्यास या ठिकाणी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी पुलाचे स्लॅब एकमेकांना जोडणारी जी लोखंडी पट्टी आहे ती पट्टीही तुटल्याने त्या लोखंडी पट्टीचाही त्रास वाहनचालकांना होत आहे. तसेच हुतात्मा चौकातून येताना पाणी वाहून जाण्यासाठी तयार केलेला काँक्रिट नाला हाही वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत आहे.अधिकारी सुट्टूीवर असल्याने पालिकेचे कामकाज थंडया पुलाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आता पालिका प्रशासन सतर्क नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तर या पुलावरील रस्त्याची दुरुस्तीही पालिकेच्या ढिसाळ कारभाराचे उदाहरण ठरत आहे. निवडणुकीचे कामकाज झाल्यावर सर्व अधिकारी हे सुट्टीवर असल्याने पालिकेचे कामकाज हे धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे या कामाला वेग देण्याची आणि उड्डाणपुलाची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.