ठाणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शनिवारी सायंकाळी दिवाळीच्या खरेदीवर पाणी फिरले. दुपारपासून सुुरू झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठाणेकरांनी खरेदीचा बेत रद्द केला किंवा ते रिकाम्या हाताने परतले. त्यामुळे ग्राहकांच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक दुकाने, शो-रूममध्ये सायंकाळी तुरळक ग्राहक दिसून आले.दिवाळीनिमित्त ठाण्याची बाजारपेठ फुलून गेली आहे. पणत्या, रंगीबेरंगी रांगोळ्या, कंदील, नवनवे कपडे, फराळ याने बाजारपेठ गेल्या १५ दिवसांपासून सजली आहे. छोटेछोटे विक्रेते लांबून रोजगारासाठी आले आहेत. गेल्या आठवड्याच्या अखेरीस खरेदीसाठी गर्दी बाहेर पडली होती. त्या वेळी रस्ते गर्दीने फुलून गेले होते. मात्र, अनेक शाळांमधील परीक्षा काल संपल्या. अनेक उद्योगांमधील कामगार, कर्मचाºयांचा बोनस अथवा सानुग्रह अनुदानाची रक्कम कालपरवाच त्यांच्या खात्यात जमा झाल्याने शनिवारी-रविवारी (उद्या) खरेदीसाठी गर्दी बाहेर पडेल, अशी विक्रेत्यांची अपेक्षा होती. त्यातच आज दुसरा शनिवार असल्याने शासकीय कार्यालयांसह अनेक खासगी आस्थापनांना सुटी होती. शनिवारी सकाळी चकचकीत ऊन पडले होते. मात्र, दुपारी २ वाजल्यानंतर अचानक आभाळात ढगांनी दाटी केली. ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. यामुळे दुपारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या ठाणेकरांची त्रेधातिरपीट उडाली. आपल्या वस्तूंचा पावसापासून बचाव करताना विक्रेत्यांचाही एकच गोंधळ उडाला. रस्त्यावरील अनेक विक्रेत्यांनी दुकानाच्या, बसस्टॉपच्या किंवा एखाद्या कोपºयात आडोशाला आसरा घेतला. एखादी सर येऊन गेल्यावर पाऊस थांबेल, अशी अपेक्षा होती. परंतु, बराच वेळ पाऊस कोसळत असल्याने अनेक विक्रेते आपला धंदा आवरून परत गेले.सायंकाळी उशिरा पावसाचा जोर कमी झाल्यावर काही ठाणेकर उशिरा खरेदीला बाहेर पडले. मात्र, त्यांची संख्या तुरळक होती. परिणामी, उद्या (रविवारी) सकाळी अनेक दुकानांत गर्दीची शक्यता आहे. रविवारी पुन्हा पाऊस नको रे बाबा, अशी प्रार्थना दुकानदार व फेरीवाले करत आहेत. दिवाळी खरेदीच्या उत्साहावर फिरल्या गेलेल्या या पाण्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटले. दिवाळीकरिता रेनकोट खरेदी केला. आता पावसा किती पडायचे तेवढे पड, असे मेसेज व्हॉट्सअॅपवर फिरत होते.पावसामुळे हातावर हात ठेवूनच बसावे लागत आहे. आम्ही ग्राहकांची आतुरतेने वाट पाहत आहोत. शनिवारी जास्तीतजास्त ग्राहक येतील, अशी अपेक्षा होती, पण पावसामुळे ती फोल ठरली.- हरीश गाला, दुकानदार
उत्साहावर पाणी फिरले, रेनकोट खरेदीची दिवाळीत आफत; शनिवार असूनही ठाणेकर राहिले घरातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 2:32 AM