कल्याण : उल्हासनगर-कल्याण रस्त्यावर वालधुनी नदीवर असलेल्या पुलाला भेगा पडल्या आहेत. तसेच पुलाच्या लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. या पुलाची देखभाल दुरुस्ती वेळीच न केल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.कल्याण-बदलापूर मार्गावर वालधुनीनजीक कल्याण व उल्हासनगरच्या हद्दीवर वालधुनी नदीवर हा पूल आहे. येथील जुना पूल अरुंद आणि धोकादायक असल्याने तो वाहतुकीसाठी बंद आहे. केवळ नवीन पुलावरून वाहतूक होत असल्याने त्यावर वाहतुकीचा ताण पडत येत आहे. त्यामुळे या पुलावरील काँक्रिट उखडले गेले आहे. पुलाला भेगा पडल्या आहेत. पुलाच्या बांधकामासाठी वापरलेल्या लोखंडी सळया उघड्या पडल्या आहेत.
कल्याण-बदलापूर रस्त्याने पुढे कर्जत, पुणे, मुरबाडकडे जाता येते. त्यामुळे तेथे जाणारी वाहने याच पुलावरून जातात. मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्ती कामामुळे वाहतुकीचा ताण कल्याणवर आला आहे. त्यात पत्रीपूल बंद केला असून, तो पाडला जाणार आहे. वालधुनी पुलावरूनही अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी विशिष्ट वेळ ठरवून दिली आहे. त्याचा फटका उल्हासनगरच्या हद्दीत पाहायला मिळतो.सध्या सुरू असलेल्या पुलाची अवस्था बिकट असल्याने त्याची देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या पुलाचे बांधकाम २००४ मध्ये झाले आहे. जुना पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने तो बंद आहे. मात्र, तो सुरू असल्यापासूनच नवीन पुलावर वाहने उभी केली जातात.सा.बां. विभागाकडून पुलाच्या देखभाल, दुरूस्तीकडे दुर्लक्षच्जुना पूल सुरू असल्यापासूनच नव्या पुलावर अवजड ट्रक आणि खाजगी बस उभ्या करून ठेवल्या जातात, याकडे आरटीओ कार्यालय व वाहतूक नियंत्रण पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उल्हासनगर शाखेच्या अखत्यारित येतो. या खात्याकडून पुलाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिक व वाहनचालकांचे म्हणणे आहे.