चले जाव... शिंदेगट आक्रमक, राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडो मारुन निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 05:37 PM2022-11-17T17:37:31+5:302022-11-17T17:38:29+5:30
राहुल गांधींनी सावरकर यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांनी आज टेंभी नाका येथे मोठे आंदोलन केले
ठाणे - काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज अकोल्यात पोहोचली असून उद्या बुलडाण्यात त्यांची जाहीर सभा होत आहे. मात्र, राहुल गांधींनी हिंगोलीत एका भाषणादरम्यान केलेल्या विधानावरुन चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणत त्यांनी २-३ वर्षांतच इंग्रजांसमोर शरणागती पत्करल्याचं राहुल गांधींनी म्हटलं होतं. त्यानंतर, राज्यात भाजप नेते आणि शिंदे गट राहुल गांधींविरुद्ध आक्रमक झाला आहे. राहुल गांधी चले जाव म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ठाण्यात आंदोलन केलं. यावेळी, राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडो मारत त्यांच्या विधानाचा निषेधही नोंदवला.
राहुल गांधींनी सावरकर यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांनी आज टेंभी नाका येथे मोठे आंदोलन केले. यावेळी, राहुल गांधींची गळाभेट घेणाऱ्या आदित्य ठाकरेंविरोधातही त्यांनी घोषणाबाजी केली. दरम्यान, राहुल गांधी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न देखील आंदोलनकर्त्यांकडून केला गेला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना रोखले. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.
काय म्हणाले होते राहुल गांधी
विनायक सावरकर यांनी इंग्रजांना माफीनामा लिहून अंदमानातील काळ्यापाण्याच्या शिक्षेतून आपली सुटका करून घेतली व त्याबदल्यात ते इंग्रजांकडून पेन्शन घेत होते, असे राहुल गांधींनी म्हटले होते. त्यानंतर, राज्यात भाजप आक्रमक झाली असून शिंदे गटानेही निषेध नोंदवला आहे.