लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेने ज्या भागात कोरोनारुग्ण आढळत आहेत, अशी सात प्रभाग समितींमधील १६ हॉटस्पॉट शोधून ३१ मार्चपर्यंत अंशत: लॉकडाऊन सोमवारी घोषित केला होता. परंतु, राज्य शासनाच्या कोणत्याही सूचना नसताना तो घोषित केल्याने मंत्रालयीन पातळीवरून कानउघाडणी झाल्यानंतर एका रात्रीतच पालिकेने घूमजाव करून मंगळवारी या हॉटस्पॉटमध्येच मायक्रो कंटेनमेंट झोन तयार करून त्या ठिकाणीच लॉकडाऊन करणार असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये एखाद्या इमारतीच्या मजल्यावर किंवा झोपडपट्टीच्या भागात एखाद्या ठिकाणी रुग्ण आढळल्यास तो स्पॉट मायक्रो कंटेनमेंट झोन घोषित करून तेथेच लॉकडाऊन घेतला जाणार आहे.ठाणे महानगरपालिका हद्दीत मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे २८ फेब्रुवारीपर्यंत ज्या हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन होता तो आता पुढील ३१ मार्चपर्यंत वाढविल्याची माहिती महापालिकेने दिली होती. परंतु, राज्य शासनाने अद्याप काही सूचना दिल्या नसताना सरसकट लॉकडाऊन कसे घोषित केले, अशा शब्दांत राज्य सरकारकडून कानउघाडणी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पालिकेने आता एका रात्रीत आपला निर्णय मागे घेऊन सरसकट लॉकडाऊन करणार नसल्याचे सांगून त्या भागातील आजूबाजूचे भाग नियमितपणे सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
आजही शहरातील काही भागांमध्ये कोरोनाबाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये माजिवडा-मानपाडा, लोकमान्य-सावरकरनगर, वर्तकनगर, उथळसर, नौपाडा, कळवा आदी भागांचा समावेश आहे. माजिवडा-मानपाडा प्रभागात तर रोजच्या रोज ४० ते ५० रुग्ण आढळून येत आहेत. काही दिवसांत येथील परिस्थिती चिंताजनक होऊ शकते.
ठाणे शहरातील १६ हाॅटस्पाॅट निश्चित काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी ज्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्या भागांचा सर्व्हे करून पुढील धोरण निश्चित केले जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार आता हा सर्व्हे झाला असून त्यात ७ प्रभाग समितींमधील १६ हॉटस्पॉट दिसून आले आहेत. त्यानुसार येत्या ३१ मार्चपर्यंत अंशत: लॉकडाऊन केला आहे. परंतु, येथील ज्या इमारतीच्या मजल्यावर किंवा झोपडपट्टीच्या एखाद्या भागात रुग्ण आढळला असेल ते स्पॉट मायक्रो कंटेनमेंट झोनमध्ये आणून तेथे लॉकडाऊन केला जाणार आहे.
कोरोनाचे नवीन २१८ रुग्णकल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत मंगळवारी कोरोनाच्या नवीन २१८ रुग्णांची भर पडली, तर १८३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. नवीन रुग्णांमुळे मनपा हद्दीतील एकूण रुग्णसंख्या ६५ हजार ०७३ झाली असून, यातील ६१ हजार ७२७ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, सध्या दोन हजार १३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.