मुरबाड : तालुक्यात आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागल्याने नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. तालुक्यात १८९ योजनांवर कोट्यवधींचा खर्च केला असला तरी टंचाई दूर झालेली नाही.
गावात एखाद्या हातपंपाला पाणी असेल तर तिथेच साऱ्या गावाची झुंबड उडते. तालुक्यातील पाटगाव, खोपिवली, घागुर्ली, मेर्दी, म्हाडस, सासणे, केवारवाडी,करचोंडे, तळेगांव, बाटलीची वाडी, खांड्याची वाडी, वाघावाडी (पेंढरी) लोत्याची वाडी या गावांत आणि आदिवासी वाड्यापाड्यांत आजही टंचाई आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी डिसेंबरपासून तेथील नागरिक प्रशासनाकडे टँकरची मागणी करीत आहेत. मात्र, कागदी घोडे नाचविणारे प्रशासन हे मार्च महिन्याची दाहकता वाढत असताना या भागातील वास्तव जाणून घेण्यासाठी चालढकल करीत आहे.
------------------------------------
कोट
तालुक्यातील टंचाईग्रस्त भागातील नागरिकांच्या टँकर मागणीचे प्रस्ताव अजून आलेले नाहीत. तरी पाटगाव परिसरात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर असून, एप्रिलपासून ती सुरू होत आहे.
- जगदीश बनकरी, अभियंता, पाणीपुरवठा विभाग