लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : टाडा कायद्यांतर्गत फरारी असलेला सिताराम उर्फ बबन सुखदेव खोसे (६६) या आरोपीला २८ वर्षांनी अटक करण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. त्याला अहमदनगर येथून सोमवारी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.खोसे याच्यावर खंडणीसह हाणामारीचे नौपाडा पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने गण्या सावंत याला नौपाडयातील एक मोकळी जागा खाली करुन द्यावी किंवा त्याबदल्यात एक लाख ८० हजारांची खंडणी द्यावी, यासाठी अरुण मुदलीयार यांना रिव्हॉल्व्हर तसेच चॉकूचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली होती. तसेच त्यांच्या कुटूंबियांनाही ठार मारण्याची धमकी दिली होती. १० एप्रिल १९९२ ते ६ आॅक्टोबर १९९२ दरम्यान हा प्रकार घडला होता. त्याच्याविरुद्ध टाडा अंतर्गतही गुन्हा दाखल झाला होता. तो अहमदनगर येथील पारनेर तालुक्यातील दर्या पाडळी गावात असल्याची माहिती पोलीस हवालदार रवींद्र काटकर यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेशकुमार मेकला, अपर पोलीस आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त किसन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, कृष्णा कोकणी, सहायक पोलीस निरीक्षक योगेश काकड, पोलीस हवालदार रवींद्र काटकर, आनंदा भिलारे, प्रकाश कदम, भरत आरोंदेकर, पोलीस नाईक संजय बाबर आणि भगवान हिवरे यांच्या पथकाने त्याला १४ डिसेंबर रोजी अहमदनगर येथून ताब्यात घेतले. नंतर नौपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
टाडा कायद्यांतर्गत फरारी आरोपीला अहमदनगर येथून २८ वर्षांनी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 9:52 PM
टाडा कायद्यांतर्गत फरारी असलेला सिताराम उर्फ बबन सुखदेव खोसे (६६) या आरोपीला २८ वर्षांनी अटक करण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. तो अहमदनगर येथील पारनेर तालुक्यातील दर्या पाडळी गावात असल्याची माहिती पोलीस हवालदार रवींद्र काटकर यांना मिळाली होती. त्याला नौपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ठळक मुद्दे ठाणे गुन्हे शाखेची कारवाई खंडणीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल