लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे शहर आणि मुंबई परिसरात सोनसाखळी, मंगळसूत्र तसेच मोबाईल खेचून पलायन करणाऱ्या अली अकबर उर्फ अली दबंग असदउल्ला खान उर्फ जाफरी (२८, रा. मुंब्रा, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सोमवारी दिली. त्याच्याकडून १०६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि १५ मोबाईल असा सहा लाख १७ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.ठाण्यातील नितीन कंपनी परिसरात पोलिासांच्या रेकॉर्डवरील इराणी अट्टल सोनसाखळी चोरटा अली येणार असल्याची ‘टीप’ वागळे इस्टेट युनिट पाचचे पोलीस हवालदार राजेश क्षत्रिय आणि शिवाजी रायसिंग यांना एका खबºयामार्फत मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर , सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, भूषण शिंदे आणि प्रशांत पवार यांच्या पथकाने १५ जानेवारी २०२१ रोजी नितीन कंपनी नाका येथे सापळा लावून अली याला ताब्यात घेतले. त्याने इतर साथीदारांच्या मदतीने ठाणे आणि मुंबई परिसरात जबरी सोनसाखळी चोरी केल्याची कबूली दिली. त्याने आतापर्यंत ठाण्यातील वागळे इस्टेट, कोपरी,श्रीनगर, चितळसर तसेच कल्याणमधील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सोनसाखळी जबरी चोरीचे वेगवेगळया साथीदारांसह दहा गुन्हे केल्याची कबूली दिली. त्याच्याकडून पाच लाख दहा हजारांचे १०६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच एक लाख सात हजारांचे जबरीने चोरलेले १५ मोबाईल जप्त केले आहेत. त्याने हे मोबाईल कोणत्या परिसरातून जबरीने चोरले याचाही, तपास करण्यात येत असल्याचे उपायुक्त पाटील यांनी सांगितले.* अली हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही जबरी चोरीसह बतावणी करुन फसवणूक केल्याचे गुन्हे मुंबईतील पायधुनी, मलबार हिल, विर्लेपार्ले आणि घाटकोपर आदी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. त्याने ठाणे शहर परिसरातही सोनसाखळी जबरी चोरी तसेच मोबाईल फोन चोरी, बतावणी करु न लोकांची फसवणुक आणि मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबूली दिली. त्याला २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. सोमवारी त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
मुंबई- ठाण्यात जबरीने सोनसाखळी चोरी करणारा वॉन्टेड अट्टल इराणी चोरटा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 11:43 PM
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे शहर आणि मुंबई परिसरात सोनसाखळी, मंगळसूत्र तसेच मोबाईल खेचून पलायन करणाऱ्या अली अकबर ...
ठळक मुद्दे ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट पाचची कामगिरीपाच लाख दहा हजारांचे सोने हस्तगत