डोंबिवली : खाकीऐवजी निळी पॅण्ट घालून कामावर हजर राहण्याचा आदेश काढल्याच्या निषेधार्थ डोंबिवलीमधील १७ वॉर्डनने कामावर न येण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र, हे आदेश वाहतूक विभागाच्या वरिष्ठांनी दिले असून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. निळी पॅण्ट घालून दोन दिवसांत हजर न झाल्यास होमगार्ड, एमएसआरडीसीच्या कर्मचाऱ्यांचे साहाय्य घेणार असल्याची तंबी वॉर्डनना देण्यात आली आहे.
निळी पॅण्ट घालून हजर राहण्याच्या मानसिकतेत आता येथील वॉर्डन आले आहेत. १७ पैैकी तीन जणांनी तो निर्णय योग्य मानून हजर झाल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे हळूहळू सगळे जण निळी पॅण्ट घालूनच हजर होतील आणि दोन दिवसांपासून निर्माण झालेला तिढा लवकरच सुटण्याची चिन्हे असल्याचे वाहतूक विभागाच्या कर्मचाºयांनी सांगितले. ‘लोकमत’मध्ये रविवारी ‘डोंबिवलीत वॉर्डनचे कामबंद आंदोलन’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत सोमवारी वॉर्डनची वाहतूक अधिकाºयांनी बैठक घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेत हा निर्णय इथून झालेला नसून मुंबईच्या वरिष्ठांनी घेतला आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश ठाणे, कल्याण येथील अधिकाºयांना देण्यात आले आहेत. वॉर्डनच्या मानधनात वाढ करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. जर सहकार्य केले नाही, तर मात्र तो प्रस्ताव मागे पडेल. त्यातही वॉर्डनचेच नुकसान आहे. वॉर्डन कामावर न आल्यास त्यांच्याएवजी जागी होमगार्ड, एमएसआरडीसीच्या कर्मचाºयांची नेमणूक करण्याचे पर्याय वाहतूक विभागापुढे आहे.