उल्हासनगर : स्थायी समितीने वाहतूक कोंडीचा ठपका वॉर्डनवर ठेऊन त्यांचा प्रस्ताव नामंजूर केला. तर आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी कोंडी सोडवण्यासाठी वॉर्डन पालिका सेवेत कायम राहणार असल्याचे सांगून सुधारित प्रस्ताव स्थायी समितीला पाठवणार असल्याचे सांगितले. आयुक्तांच्या आक्रमक भूमिकेमुळे स्थायी समिती सभापतींसह सत्ताधारी नरमले.उल्हासनगरमधील बहुतांश रस्ते अरूंद असून सिग्नल यंत्रणा अस्तित्वात नसल्याने वाहतूक कोंडी नेहमीची झाली. नागरिकांना कोंडीतुन दिलासा देण्यासाठी काही वर्षापूर्वी पालिकेने वाहतूक पोलिसांना २५ वॉर्डनसह जॅमर व इतर साहित्य दिले. वाहतूक पोलिसांच्या मदतीला वॉर्डन आल्याने कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र कालांतराने वाहतूक पोलिसांपेक्षाही या वॉर्डनची दादागिरी वाढली. कोंडी सोडवण्याऐवजी चौकाचौकात व आडरस्त्यावर गाडया अडवणे, कागदपत्रांची तपासणी करणे, दंड आकारणे, बेकायदा वसुली करणे, नागरिकांशी उर्मटपणे बोलणे अशा तक्रारी येत होत्या.महापालिका या वॉर्डनच्या पगारावर लाखो रूपये खर्च करत आहे. मात्र कोंडी जैसे थे आहे, असा आरोप सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी यांनी केला. स्थायी समिती बैठकीत वॉर्डनबाबत प्रस्ताव येताच बहुुतांश सदस्यांनी वॉर्डन नको रे बाबा, अशी भूमिका घेत प्रस्ताव नामंजूर केला. एकाच वेळी ४५ वॉर्डन आॅक्टोबरमध्ये बेरोजगार होणार होते. शिवसेनेचे नगरसेवक अरूण अशान यांनी वॉर्डनची शहराला गरज असल्याचे सांगून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढे गाºहाणे मांडले. खासदार शिंदे यांनी आयुक्त निंबाळकर यांच्याशी संपर्क साधून वॉर्डनचे महत्व पटवून दिले. तसेच अशान यांनी शिष्टमंडळासह आयुक्तांची भेट घेऊन शहराची स्थिती समजावून सांगितली.आयुक्तांनी पत्रकार परिषदेत शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वॉर्डनची गरज आहे, असे सांगितले. त्यामुळे वॉर्डन पालिका सेवेत कायम राहणार असल्याचे सांगितले. तसेच स्थायी समितीने नामंजूर केलेला प्रस्ताव चुकीचा असून सुधारित प्रस्ताव समितीला पाठवणार असल्याचे म्हणाले.विरोध करणारे नेते झाले गप्पवॉर्डन विरोधात आवाज उठवणारे सभागृह नेते जमनु पुरस्वानी तसेच महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी, स्थायी समिती सभापती कंचन लुंड, माजी आमदार कुमार आयलानी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्यासमोर महापौरांच्या पत्रकार परिषदेत वॉर्डन पालिका सेवेत कायम राहणार असल्याचा पुवरूच्चार केला. आयुक्तांच्या वक्तव्यावर कुणीही प्रतिक्रीया व्यक्त केली नाही
वॉर्डन सेवेतच राहणार , आयुक्तांचा निर्णय, स्थायी समितीला सुधारित प्रस्ताव देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 5:58 AM