भिवंडी: भिवंडीतील ग्रामीण भागात गोदाम पट्टा मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे मात्र या गोदामपट्ट्यासाठी आवश्यक असलेला मजूर वर्ग व्यावसायिकांसह कंपनी मालकांना मिळत नसल्याने भिवंडीतील तरुणांवर बेरोजगारीचे संकट आले असून हे संकट कमी करण्यासाठी भिवंडीतील वाशी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या माध्यमातून तरुणांसाठी वेअर हाऊस ट्रेनिंग प्रोग्रामचे आयोजन मागील तीन महिन्यांपूर्वी करण्यात आले होते शेकडो तरुण तरुणी या शिबिरात सहभागी होत आपले प्रशिक्षण पूर्ण केले.
या प्रशिक्षणार्थी तरुणांना प्रमाणपत्र कंपनीउपयोगी साहित्याचे वाटप शनिवारी गुंदवली येथील गणेश कंपाउंडमध्ये असलेल्या वाशी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या सभागृहात करण्यात आले होते.या प्रशिक्षणाच्या सांगता समारोपा प्रसंगी शिवसेनेचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा, वाशी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे मालक मदनभाई,डीबीएमचे प्रमुख परमजीत सिंग, गुंदवलीचे माजी सरपंच विलास पाटील,यांच्यासह कंपनीचे पदाधिकारी व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी कंपनीच्या कम्प्युटर ट्रेनिंग सेंटरचे उदघाटन देखील सुरेश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
भिवंडीत गोदाम पट्टा मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे मात्र येथील तरुणांमध्ये प्रशिक्षणाचा अभाव असल्याने आजही तरुण कमी पगारावर काम करत आहेत. त्यामुळे येथील तरुणांना प्रशिक्षण दिल्यास येथील तरुण देखील मोठ्या पगारावर काम करतील व या वेअर हाऊसिंग प्रशिक्षणातून निश्चितच हे तरुण भविष्यात मोठ्या कंपनीचे व्यवस्थापक होतील आणि त्यातून शहराचा विकास देखील होण्यास हातभार लागेल असे मत यावेळी वाशी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे मालक व आयोजक मदन भाई यांनी व्यक्त केले. वाशी इलेक्ट्रॉनिक्स फाउंडेशनच्या माध्यमातून अशा प्रकारचे कार्यक्रम मागील २५ वर्षापासून कंपनी राबवीत असल्याचेही मदन भाई यांनी यावेळी सांगितले
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांचा आशीर्वाद आम्हाला लाभल्यामुळे आम्ही राजकारणात राहून देखील समाजसेवा करतो आहोत, समाजसेवेचा हा वसा आम्ही दिघे साहेबांकडून घेतला आहे जो आजही सुरू आहे. येथील गोदामांच्या माध्यमातून तरुणांना रोजगार देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. आजपर्यत हजारो तरुणांना आपण रोजगार दिला आहे,आणि या शिबिरातून प्रशिक्षित तरुण गोदाम कंपन्यांना मिळणार असल्याने तरुणांसाठी व कंपन्यांसाठी देखील महत्वाचे ठरणार आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे.