अजित मांडके
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूरची वारी होत नसल्याचा फटका वारकऱ्यांसह एस. टी. महामंडळालाही बसला आहे. मागील दोन वर्षे ठाणे जिल्ह्यातून वारीसाठी जाणाऱ्या भक्तांसाठी एकही बस सुटलेली नाही. यापूर्वी ठाणे विभागातून सुमारे ३५० च्या आसपास बसगाड्या वारीसाठी पंढरपूरला जात होत्या. गेल्या दोन वर्षांत एसटीला ७० लाखांच्या आसपास उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर वारीची जशी वारकऱ्यांना ओढ लागते, तशीच ओढ एसटीला देखील लागते. वारकऱ्यांना घेऊन जाण्यासाठी एसटी महामंडळाची दरवर्षी लगबग असते. ठाणे एसटी विभागाकडून आठ आगारांतून पंढरपूरला जाण्यासाठी दरवर्षी ३५० बसगाड्या सोडल्या जात होत्या. पंढरपूरला जाईपर्यंत या बसमधील वातावरण भक्तिमय होऊन जात होते. राज्य शासनाने केवळ मानाच्या दहा पालख्याच पंढरपूरला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भक्तांचा हिरमोड झाला. एसटी महामंडळाचा देखील हिरमोड झाला.
..............
दरवर्षी पंढरपूरसाठी किती बसगाड्या सोडल्या जायच्या - ३५०
त्यातून किती उत्पन्न मिळायचे - ३५ लाख
एसटीतून दरवर्षी साधारण कितीजण प्रवास करायचे - २२ हजारांच्या आसपास
जिल्ह्यातून दरवर्षी जाणाऱ्या पालख्या - एकही नाही
मानाच्या दहा पालख्या जात असल्याने जिल्ह्यातून एकही पालखी पंढरपूरला जात नव्हती.
................................
वारकऱ्यांचे गावी मन रमेना
मी दरवर्षी पंढरपूरच्या वारीला नित्यनेमाने जात असतो. परंतु, मागील वर्षी जाता आले नाही. त्यामुळे विठ्ठलाकडे प्रार्थना केली होती की, यंदा तरी मला तुझ्या दर्शनासाठी येऊ दे. मात्र, यंदादेखील कोरोनाचे सावट असल्याने पंढरपूरची वारी चुकली आहे.
- रवी जडे, वारकरी
.............
वारीत गेल्यावर मन प्रसन्न होते. नवी ऊर्जा घेऊन आम्ही पुन्हा घरी येत असतो. मात्र, सलग दोन वर्षे वारीला जाता आलेले नाही. त्यामुळे घरात मन रमत नाही. आता तरी विठ्ठलाने कोरोनाला रोखून पुढील वर्षी तरी वारीला येण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावा.
- प्रकाश ताम्हाणे, वारकरी
...........
ठाणे विभागातून दरवर्षी ३५० बसगाड्या वारीसाठी सोडल्या जात होत्या. परंतु, दोन वर्षे कोरोनाचे सावट असल्याने वारीसाठी बसगाड्या सोडण्यात आलेल्या नाहीत.
- विनोदकुमार भालेराव, विभागीय नियंत्रण, एसटी, ठाणे
............