ठाणे : वारकऱ्यांसाठी बांधण्यात आलेले वारकरी भवन आज तब्बल ८ वर्षानंतर खासदार राजन विचारेंच्या प्रयत्नांमुळे जेष्ठ नागरिक, वारकरी मंडळ, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कलावंतांना परत मिळाले. आज महापालिका आयुक्तांनी त्यांना अधिकृत वाटप पत्र दिले.
वारकरी भवनाचे भूमिपूजन २००७ साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. ही वास्तू २०१० साली बनून तयार झाली. ह्या वास्तूचे लोकार्पण २०११ साली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. तरीही सदर वास्तू वारकरी संप्रदायाच्या लोकांना हस्थांतरित केलेली नव्हती. त्या नंतर २०१६ साली महानगरपालिकेने एक ठराव पास केला होता त्यात स्पष्ट उल्लेख केलेला की सदर वस्तूचा पाहिला मजला ज्येष्ठ नागरिकांसाठी, दुसरा मजला संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज वारकरी संघ यांच्यासाठी व तिसरा मजला अखिल भारतीय नाट्य संमेलन ठाणे शाखेसाठी राखीव ठेवण्यात आलेला होता. ठराव संमत होऊनही सदर लोकांना त्या वास्तूचा ताबा दिला गेला नाही. त्या ठरावालाही आज २ वर्ष पूर्ण झाले आहेत. २०१७ साली ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाची इमारत धोकादायक झाल्या कारणास्तव वारकरी भवनाची ईमारत ५-६ महिन्यांसाठी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने वापरण्यास मिळावी अशी मागणी केली होती. महानगरपालिकेमध्ये न्यायालयाला सादर वस्तू तात्पुरत्या वेळेसाठी देण्यात यावी ह्यासाठी ठराव ही मंजूर झाला होता. ठरावातील दिलेला कालावधी पूर्ण होऊनही एक वर्ष सहा महिने झाले तरीही न्यायालयाने सदर वास्तू वापरात घेतली नाही. वारंवार वारकऱ्यांनी आयुक्तांना भवनाची मागणी केली असता त्यांना तारखां व्यतिरिक्त काहीही मिळाले नाही. ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन आज खासदार राजन विचारेंनी जेष्ठ नागरिक संघ, वारकरी संप्रदायाचे शिष्ठ मंडळ व अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कलावंतांना घेऊन ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटून निवेदन दिले व वारकरी भवन सर्व संस्थेंना परत मिळवून दिले. या वेळेला आयुक्तांनी लेखी स्वरुपात पत्र सर्व संस्थेंना दिले व हा विश्वास दर्शवला की न्यायालयाकडून सदर इमारत मिळतात आपल्या सर्व संस्थांकडे सुपूर्त केली जाईल. या वेळी निवेदन देताना खासदार राजन विचारे, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, जेष्ठ नागरिक मध्यवर्ती समिती ठाणेचे प्रतिनिधी बळवंत कर्वे, संत शिरोमणी ज्ञानेश्वर माउली सेवा मंडळ ठाणे वारकरी समाजाचे प्रतिनिधी दिनकर पाचांगे व अखिल भारतीय नाट्य परिषद ठाणे शाखेचे कार्याध्यक्ष विध्याधर ठाणेकर व सदर संस्थेंचे कार्यकर्ते उपस्थित होते.