कल्याण : श्री ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय वारकरी सेवाभावी ट्रस्टला अभ्यासिका आणि ग्रंथालयासाठी आरक्षित झालेले सभागृह देण्याचा प्रस्ताव केडीएमसीने मंजूर केला होता. मात्र, हे सभागृह सरकारच्या कौशल्यविकास योजनेसाठी परस्पर देण्यात आले. केडीएमसी प्रशासनाच्या या कृतीचा सोमवारी निषेध करण्यासाठी वारकरी संप्रदायाने महापालिकेवर ग्रंथ दिंडी धडक मूकमोर्चा काढला. या वेळी त्यांनी महापौर राजेंद्र देवळेकर आणि आयुक्त ई. रवींद्रन यांना निवेदन दिले. महापालिकेच्या नोव्हेंबर २०१३ मध्ये झालेल्या महासभेत गांधारे येथील अॅमेनिटी स्पेसच्या जागेवर वारकरी भवन आणि महिला उद्योग केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यानुसार, कल्याणच्या श्री ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय वारकरी सेवाभावी ट्रस्टला अभ्यासिका आणि ग्रंथालयासाठी आरक्षित असलेले सभागृह संत साहित्य-वाचनालय आणि ग्रंथालयासाठी नाममात्र भाडेतत्त्वावर देण्याच्या उपसूचनेलाही महासभेने मान्यता दिली होती. हे सभागृह मंजूर ठरावानुसार मिळावे, म्हणून महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. या जागेचा वापर कशासाठी करणार, हे ट्रस्टने जानेवारी २०१६ मध्ये पत्राद्वारे कळवले होते. ही जागा हस्तांतरणाच्या अनुषंगाने कायदेशीर प्रक्रियेसाठी मालमत्ता विभागात सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मात्र, प्रशासन अधिकाऱ्यांनी वेळकाढू धोरण अवलंबल्याने आजपर्यंत सभागृहाची जागा ट्रस्टला मिळालेली नाही. मात्र, हे सभागृह मनमानी पद्धतीने आणि बेकायदा सरकारच्या विकास कौशल्य प्रकल्पासाठी देण्याबाबत केडीएमसीने कार्यवाही सुरू केल्याचे ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सभागृह ट्रस्टला देण्याबाबत महासभेने ठराव मंजूर करून प्रशासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला असताना प्रशासनाने चालवलेला मनमानी कारभार हा महासभेबरोबरच वारकरी संप्रदायाचा अपमान असल्याचे ट्रस्टने म्हटले आहे. दरम्यान, कल्याण पश्चिमेतील न्यू मनीषानगर येथील गजानन महाराज मंदिर परिसरातून निघालेला मोर्चा बेतुकरपाडा, दक्षिणमुखी मारुती मंदिर, टिळक चौकमार्गे केडीएमसीवर धडकला. त्यात वारकरी मोठ्या संख्येने होते. (प्रतिनिधी)
वारकऱ्यांचा ग्रंथ दिंडी मोर्चा
By admin | Published: February 14, 2017 2:46 AM