भिवंडी - कंपनीत मशीन ऑपरेटर म्हणून काम करीत असताना अपघात होऊन बोटे गमावलेल्या कामगाराकडे कंपनी प्रशासनाने दुर्लक्ष केले. या कामगाराची दखल सिद्धार्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने घेतली असून कामगाराच्या न्याय्य हक्कासाठी संस्थेने आता पुढाकार घेतला आहे. अपघातग्रस्त कामगाराला कंपनीने आठ दिवसांत न्याय न दिल्यास कंपनीविरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा सिद्धार्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव अभिलाष डावरे यांनी कंपनीस दिला आहे. तसेच त्यासंदर्भातील लेखी निवेदनही डावरे यांनी पडघा पोलीस ठाण्यात दिले आहे.
पडघा पोलीस ठाण्यात अलाइन रिटेल ट्रेंड प्रा.लि. ही कंपनी असून या कंपनीत अशोक मोहिते हे मशीन ऑपरेटर म्हणून काम करीत असताना अपघात होऊन बोटे तुटून निकामी झाली. या अपघातानंतर कंपनीने कामगारावर डोंबिवली येथील खासगी रुग्णालयात उपचार केले, परंतु या अपघाताची नोंद कोठेही न केल्याने सुमारे एक महिन्याने कामगारास कामावर हजर करून घेतले. परंतु, त्यास आर्थिक नुकसानभरपाई न देऊन कामगारावर अन्याय केला आहे. याबाबत अभिलाष डावरे यांनी कंपनीकडे पत्रव्यवहार करून कामगारास नुकसानभरपाई देऊन कायमस्वरूपी कामावर घ्यावे, अशी मागणी केली.