शिवराळ शिवतारेंना आवरा, अन्यथा कल्याणमध्ये...; अजित पवार गटाच्या नेत्याचा इशारा

By जितेंद्र कालेकर | Published: March 12, 2024 10:38 PM2024-03-12T22:38:01+5:302024-03-12T22:43:05+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे.

Warning of Ajit Pawar group leader anand paranjape to cm eknath shinde | शिवराळ शिवतारेंना आवरा, अन्यथा कल्याणमध्ये...; अजित पवार गटाच्या नेत्याचा इशारा

शिवराळ शिवतारेंना आवरा, अन्यथा कल्याणमध्ये...; अजित पवार गटाच्या नेत्याचा इशारा

ठाणे : शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे यांच्यासारख्या नेत्यांना आवरावे, अन्यथा आम्हीही राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला जर वाटत असेल की, कल्याण लोकसभा जिंकणे सोपे आहे. तर कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय लागू शकतो, हे लक्षात ठेवावे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक आनंद परांजपे यांनी मंगळवारी दिला.

परांजपे म्हणाले की, शिवसेनेच्या शिंदे गटाचे शिवतारे यांनी अत्यंत चुकीच्या प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल दिल्या आहेत. शिवसेनेचे नेते सातत्याने बारामती व रायगड लोकसभा मतदारसंघासारख्या राष्ट्रवादी काँग्रेसची शक्तिस्थळे, स्वाभिमान यांवर वारंवार टीका-टिपणी करीत असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्यांना आवरावे, अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. जिल्ह्यातील महायुतीमध्ये चांगले वातावरण रहावे, असे जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर, शिवराळ शिवतारे यांना अडवावे. त्यांना योग्य ती समज द्यावी. आमच्या नेत्यांवर, स्वाभिमानावर जर कोणी घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय आणि वेगळे चित्र दिसू शकते.

आमच्या सगळ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या शरदचंद्र पवार यांच्याबद्दल, व्यक्तिगत खालच्या पातळीवरील टीका तत्कालीन राज्यमंत्री शिवतारे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना अजित पवार तेव्हा बोलले होते की, तुझा आवाका किती, तू बोलतोस किती, यावेळी तू कसा आमदार बनतो हेच पाहतो. महाराष्ट्राला माहीत आहे की, अजित पवार जे बोलतात ते करून दाखवतात. ते त्यांनी करून दाखविले. भाजपचे केंद्रीय नेतृत्व गृहमंत्री अमित शहा, अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे सर्व नेते, जागावाटपाची योग्य ती बोलणी करतील आणि ठाणे, भिवंडी, कल्याण येथून महायुतीचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वासही परांजपे यांनी व्यक्त केला.

Web Title: Warning of Ajit Pawar group leader anand paranjape to cm eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.