लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्रा : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या वितरणाचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा, अन्यथा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीअभावी सिलिंडरचे घरोघरी करण्यात येणारे वितरण थांबवावे लागेल, असा इशारा मुंब्र्यातील गॅस एजन्सीच्या व्यवस्थापकाने दिला आहे. कोरोनाच्या उच्चाटनासाठी सध्या सुरू असलेल्या लाॅकडाऊनमध्ये स्वयंपाकाच्या गॅसच्या वितरणाचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आलेला नाही. यामुळे या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या लोकल सेवेतून प्रवास करण्यास मज्जाव करण्यात येत आहे. यामुळे वितरणाचा कणा असलेल्या डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील काही दिवसांपासून एजन्सीच्या कार्यालयापर्यंत तसेच पुन्हा घरी पोहोचण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रेल्वेच्या तिकीट खिडकीवरील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत समावेश नसल्याचे कारण पुढे करून अनेकदा त्यांना तिकीट देण्यास नकार देत आहेत. यामुळे त्यांच्याशी तिकिटासाठी हुज्जत घालावी लागते. यामध्ये वेळेचा अपव्यय होत असून, त्याचा कामावर परिणाम होत असल्याची माहिती दीपक महाजन या सिलिंडरची डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.
.................
अत्यावश्यक सेवेत समावेश नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रवासादरम्यान अडचणी येत आहेत. यातून मार्ग निघावा यासाठी या सेवेचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा. तसे न झाल्यास सिलिंडरचे वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यालय गाठणे कठीण होईल. तसे झाल्यास नाईलाजास्तव सिलिंडरचे घरोघरी होणारे वितरण थांबवावे लागेल.
-सुधीर कोप्पल,
व्यवस्थापक, योगेश गॅस एजन्सी, मुंब्रा