मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा गैरवापर करून शौचालयाचे बाहेरील आवारातच चक्क खाजगी गाड्यांची धुलाई केली जात असल्याचा गैरप्रकार उघडकीस आला आहे .
भाईंदर पश्चिमेस नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाला लागून महापालिकेचे सार्वजनिक शौचालय आहे . सदर शौचालयाच्या देखभाल - स्वच्छतेसाठीची जबाबदारी महापालिकेच्या देखरेखी खाली होते . परंतु सदर ठिकाणी देखभालीसाठी ठेवलेल्या लोकां कडून मात्र पालिकेच्या पाण्याची चक्क बेकायदा विक्री खाजगी वाहनांच्या साफसफाई साठी केली जात असल्याचे उघडकीस आले आहे .
येथील कर्मचारी पालिकेच्या पाण्याची विक्री खाजगी वाहन चालकांना त्यांच्या वाहनांच्या धुलाई साठी नियमितपणे करत आहेत . त्यामुळे शौचालयाच्या समोरच्या भागात गाड्यांचे बेकायदेशीर वॉशिंग सेंटरच जणू सुरु झाले आहे . सकाळ पासून रात्री पर्यंत येथे मोठ्या बस , रिक्षा , मोटारकार आदी सर्रास शौचालयातील पाणी घेऊन धुतल्या जातात . रस्त्यावरच धुलाईचे काम केले जात असल्याने वाहतुकीला अडथळा होतोच शिवार रस्त्यावर पाणी साचून असते .
पालिकेच्या पाण्याची बेकायदेशीर विक्री करून खाजगी वाहनांची धुलाई पैसे घेऊन केली जात असल्याची तक्रार युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश बामणे यांनी महेश चव्हाण, शुभम ढोके,प्रशांत मोरे आदी पदाधिकाऱ्यां सोबत जाऊन महापालिका आयुक्त.डाॅ.विजय राठोड, आरोग्य विभागाचे उपायुक्त डाॅ.संभाजी पानपट्टे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक खांबित आदींना केली आहे . पालिकेचे लाखो लिटर पाणी बेकायदेशीरपणे विकून मालमत्तेचा दुरुपयोग व गैरप्रकार करणाऱ्या येथील कर्मचारी आणि त्यांच्या ठेकेदारावर कारवाई करावी . ठेका रद्द करून पाणीचोरीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी बामणे यांनी केली आहे .