अभय फाटक
नारळाच्या झाडाला आपण कल्पवृक्ष म्हणतो. कारण, याच्या शेंड्यापासून मुळापर्यंत सर्व भाग आपण वापरतो. याच्या फळाच्या म्हणजे नारळाच्या करवंटीचा कलात्मकतेने वापर केला, तर अतिशय सुंदर शोभेच्या वस्तू तयार करता येतात. पेशाने शिक्षक आणि मनाने कलाकार असलेल्या शंकर माने यांचा छंदही असाच वेगळा आहे. नारळाच्या करवंटी आणि बांबूपासून अतिशय सुंदर आणि सुबक कलाकृतींना आकार देणाऱ्या माने यांच्या छंदाविषयी जाणून घेऊ.
या छंदाची सुरुवात मात्र एका वेगळ्या कारणाने झाली. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, लहानपणी खेळणी विकत घेता येत नव्हती. पण, परिस्थितीपुढे हार न मानता त्यातून मार्ग शोधून काढला. लहान वयातच माने यांनी मातीच्या आणि इतर मिळेल त्या वस्तूंपासून स्वत:साठी खेळणी बनवली आणि आपला जीव रमवला. त्याचबरोबर शंखशिंपले आणि काडेपेट्या गोळा केल्या.शेतातील गवत आणि मातीपासून गाडी आणि इतर खेळणी बनवली. एकदा एक गणपतीची मूर्ती आणि देऊळ तयार केलं. ते इतकं हुबेहूब होतं की, आईवडिलांनी कौतुक केलं. आजूबाजूच्या लोकांनीच नव्हे तर शिक्षकांनीदेखील कौतुक केलं आणि लोक ते बघायला येऊ लागले. शिक्षणाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना चालना देऊन प्रोत्साहन देण्यासाठी माने यांनी आपला छंद विद्यार्थ्यांना शिकवला. या कौशल्याच्या आधारे विद्यार्थी कलेच्या क्षेत्रात आपले करिअर घडवू शकतात व कलाकुसरीच्या निर्मितीतून अर्थार्जन करून स्वावलंबी होऊ शकतात, यासाठी माने प्रयत्न करत आहेत.जेवणामध्ये खोबºयाचा वापर केला गेला की, त्याची करंवटी बहुतेकदा आपण फेकून देतो. परंतु, तीच करवंटी घेऊन त्याचा आकार पाहून त्याच्यापासून विविध प्रकारच्या कलाकृतींची निर्मिती करता येते. अशा करवंटीपासून शंभरहून अधिक वस्तूंची निर्मिती शंकर माने यांनी केली आहे. बांबू ही वनस्पती गावागावांतून सहज उपलब्ध होत असते. अशा या बांबूपासून विविध प्रकारच्या शोभिवंत वस्तूंची निर्मिती शंकर माने यांनी केली आहे. यात बांबूपासून घरांचे मॉडेल्स, जहाज, सायकल, मंदिर, ताजमहाल, फुलदाण्या इ. विविध कलाकृती बनविल्या आहेत.जुन्या पाठ्यपुस्तकातील कात्रणे काढून त्यापासून त्रिमितीय रचना तयार केली. इयत्ता चौथीच्या इतिहासातील जुन्या पाठ्यपुस्तकातील चित्रांची कात्रणे काढून त्रिमितीय शिवचरित्र निर्माण केले आहे. त्याचा शैक्षणिक साहित्य म्हणूनही उपयोग करण्याचा माने यांचा प्रयत्न आहे. रानावनात फिरत असताना विविध प्रकारचा लाकूडफाटा पडलेला आढळतो. त्यापासून विविध प्रकारच्या शोभिवंत वस्तूंची निर्मिती केली. यातून विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन नवनिर्मितीचे कौशल्य निर्माण होऊ लागलं.या सगळ्यांचा परिणाम म्हणजे, या आनंददायी शिक्षणामुळे विद्यार्थी शाळेत रमू लागले. विद्यार्थी स्वत: कृती करू लागले. ‘पुनर्वापर नैसर्गिक साधनसंपत्तीचा, मंत्र पर्यावरणरक्षणाचा’ या उक्तीप्रमाणे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती करण्याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये झाली.
छंद आणि कार्यानुभव यांची सांगड घालणारे माने हे पहिलेच शिक्षक आहेत.एनसीआरटी संस्थेच्या २५० नावीन्यपूर्ण उपक्रमांत माने यांचा हा उपक्र म पहिल्या ५० उपक्रमांमध्ये निवडला गेला. राज्यस्तरीय शिक्षणाची वारी २०१८-१९ मध्येही त्यांचा सहभाग होता. महाराष्ट्रभर त्यांनी दौरे केले. मुंबई, कोल्हापूर, वर्धा, नांदेड, जळगाव येथे आयोजित शिक्षणाच्या वारीत कलाकृतींची मांडणी व सादरीकरण केलं. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना प्रात्यक्षिकं करून दाखवली. थिबा राजवाडा रत्नागिरी येथे आयोजित कला महोत्सवात आपल्या कलेचं सादरीकरण केलं. लहानपणीच्या खेळण्याच्या गरजेतून जन्माला आलेल्या कलाविष्काराचेच छंदात रूपांतर झाले.
(लेखक संग्राहक असून द हॉबी सर्कलचे संस्थापक आहेत.)