प्रशांत माने।लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : स्वच्छ भारत अभियानांतर्गत केडीएमसीने पाच प्रभागांमध्ये एजन्सीमार्फत स्वच्छता मार्शलची नेमणूक केली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर लघुशंका करणे, शौच करणाऱ्यांवर दंड निर्धारित केला असताना आता पदपथ आणि रस्त्यांलगत डेब्रिज टाकणाºयांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तीन वर्षांपूर्वी स्वच्छ सर्वेक्षण शहर स्वच्छतेप्रकरणी घसरलेल्या मानांकनाचा धसका घेतलेल्या प्रशासनाने डेब्रिज ‘आॅन कॉल’ ही सुविधा सुरू केली होती. काही महिन्यांतच तीनतेरा वाजल्याने ती बासनात गुंडाळावी लागली. ही सुविधा सुरू करण्याबरोबरच आता दंडात्मक कारवाईचा पवित्रा घेतला आहे.स्वच्छता सर्वेक्षण अभियानांतर्गत तीन वर्षांपासून केडीएमसी परिक्षेत्रात जनजागृती तसेच विविध उपाययोजनांचे फंडे आजमावले जात आहेत. यात ओला-सुका कचºयाचे वर्गीकरण करणे, ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांना महापालिकेतर्फे मालमत्ताकरात पाच टक्के सूट देणे, डेब्रिज आॅन कॉल यांचा समावेश आहे. सध्या टिटवाळ्यातील ‘अ’ प्रभाग, कल्याणमधील ‘ब’ आणि ‘क’ तसेच डोंबिवलीमधील ‘फ’ आणि ‘ग’ प्रभागांत स्वच्छता मार्शलची नेमणूक केली आहे. या पाचही प्रभागांत प्रत्येकी १० स्वच्छता मार्शल नेमले आहेत. सरकारी निर्णयानुसार रस्ते/मार्गावर घाण करणे १५० रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि उघड्यावर लघुशंका करणे प्रत्येकी १०० रुपये, तसेच उघड्यावर शौच करणे ५०० रुपयांप्रमाणे दंड निश्चित केला आहे. १५ आॅगस्टपासून ही कारवाई सुरू केली आहे. मात्र, आता इमारती, बंगले आदी मालमत्तांची दुरुस्ती केल्यानंतर पदपथ अथवा रस्त्यांवर डेब्रिज टाकणाºयांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ‘डेब्रिज आॅन कॉल’ ही मोहीम गुंडाळण्याची नामुश्की ओढवलेले प्रशासन ही कारवाई प्रभावीपणे करेल का, याकडे लक्ष लागले आहे. डेब्रिज आॅन कॉल सुविधेचा आढावा घेता २०१७ मध्ये शहर स्वच्छतेच्या मानांकनात घसरण झाली. त्यानंतर जाग आलेल्या डेब्रिज ‘आॅन कॉल’ची सुविधा सुरू करण्यात आली होती. डोंबिवली आणि २७ गावांसाठी तर कल्याण पूर्व आणि पश्चिम आणि टिटवाळा परिसरातील नागरिकांसाठी स्वतंत्र मोबाइल क्रमांक देऊन विनाशुल्क डेब्रिज उचलण्यासाठी ‘आॅन कॉल’ ही सुविधा बांधकाम विभागाने सुरू केली होती. कॉल केल्यास तत्काळ डेब्रिज उचलले जाईल, असा दावा अधिकाºयांनी केला होता; मात्र काही महिन्यांतच त्याचे तीनतेरा वाजल्याने ती बासनात गुंडाळावी लागली.विद्रूपीकरण आणि आरोग्यही धोक्यातडेब्रिजमुळे सावित्रीबाई फुले कलामंदिर ते डोंबिवली अग्निशमन केंद्रापर्यंतच्या रस्त्याचे एकप्रकारे विद्रूपीकरण झाले आहे. रस्त्याच्या दुतर्फा डेब्रिज टाकले जात असल्याने तेथे ढीग जमा झाले आहेत. या रस्त्यावर सावित्रीबाई फुले नाट्यगृह, बीएसएनएल, पोस्ट आॅफिस, भारतीय जीवन विमा निगम आणि भारतीय स्टेट बँक आदी महत्त्वाची कार्यालये आहेत. पेंढरकर महाविद्यालय आणि अस्तित्व शाळेचा मागील रस्ता ही डेब्रिज टाकण्याची हक्काची ठिकाणे झाली आहेत.बांधकाम व्यावसायिकांना पाच हजार रुपयांचा दंडडेब्रिज उचलण्यासाठी आॅन कॉल ही सुविधा पुन्हा चालू केली जाणार आहे. डेब्रिज टाकणाºयांवर आता दंडात्मक कारवाईही केली जाणार आहे. बांधकाम व्यावसायिकांना पाच हजारांचा दंड, तर नागरिकांना १०० ते ५०० रुपयांपर्यंत दंड आकारण्याचे विचाराधीन आहे. तसेच जेवढे डेब्रिजचे प्रमाण असेल, त्याप्रमाणेही दंडाची रक्कम आकारली जाईल, अशी माहिती केडीएमसी डोंबिवली विभागाचे सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांनी दिली.
रस्त्यांलगत डेब्रिज टाकणाऱ्यांवर ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 12:23 AM