लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बीएसयुपी योजनेतील गोरगरिबांच्या घरांमध्ये अनधिकृतरित्या बिऱ्हाड थाटणाऱ्या बोगस सदनिकाधारकांचा मनसेने पर्दाफाश केला होता. ठाण्याच्या धर्मवीर नगर येथील बीएसयुपी योजनेतील घरांचा हा घोटाळा चव्हाट्यावर येताच ठाणे पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. मनसेच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने आता बीएसयूपीतील घरांवर वॉच ठेवण्यासाठी थेट चौकशी समितीच नेमली आहे. या समितीच्या माध्यमातून अनेक धक्कादायक खुलासे समोर येणार आहेत. त्याआधीच अनेक अनधिकृत भाडेकरूंना नोटीस बजावल्यानंतर त्यांनी बाहेरचा रस्ता धरला आहे. मात्र या घरांमध्ये काही वर्षांपासून ठाण मांडून राहणाऱ्या या भाडेकरूंचे भाडे नेमके 'खाल्ले' कोणी, कोणत्या अधिकाऱ्यांचा या घर भाडेकरूंवर 'वरदहस्त' होता, या अनुत्तरित प्रश्नांचीही उत्तरे मिळायलाच हवी, अशी आग्रही मागणी मनसेने केली आहे.
धर्मवीर नगर येथे २०१३ साली बीएसयुपी योजनेंतर्गत उभारलेल्या आनंदकृपा सोसायटी इमारत क्रमांक २३ मध्ये रहिवाशांना सदनिका देण्यात आल्या होत्या. या इमारतींमधील ६०३, ८०२, ८०४, ८०५ व ८०७ या सदनिकांचा अनधिकृतरित्या ताबा घेतला होता. याबाबतची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्याकडे आली होती. सोसायटीच्या रहिवाशांनी या प्रकरणी पालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही संबंधित विभागाने बोटचेपी धोरण स्वीकारल्याने अखेर मनसे विभागाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी रहिवाशांच्या शिष्टमंडळासह पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांची भेट घेतली. माळवी यांनी प्रशासनाला कारवाईचे देताच संबंधित इमारतीमधील अनधिकृतरित्या राहणाऱ्या रहिवाशांच्या घरांचा पंचनामा करण्यात आला. यासोबतच अनधिकृत पद्धतीने राहणाऱ्या भाडेकरूंना बाहेरचा रस्ता दाखवत घर रिकामी करण्यात आली. मात्र मनसेने हा विषय गंभीर असल्याचे स्पष्ट करत आयुक्तांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी केली होती. अखेर ठाणे पालिकेचे आयुक्त विपीन शर्मा यांनी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीचे गठन केले असून आता बीएसयूपीतील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.
अतिरिक्त आयुक्त ते कार्यकारी अभियंत्यांचा समावेश अध्यक्ष - संजय हेरवाडे (अतिरिक्त आयुक्त- २), सदस्य - अश्विनी वाघमळे (उपायुक्त स्थावर मालमत्ता), मनिष जोशी (उपायुक्त परिमंडळ -१), वर्षा दिक्षीत (उपायुक्त समाज विकास विभाग), उपनगरअभियंता शहर विकास विभाग, महेश आहेर ( कार्यालयीन अधिक्षक स्थावर मालमत्ता विभाग), कार्यकारी अभियंता बीएसयुपी कक्ष अशी सात सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे.
घोटाळा उघड होणार बीएसयुपी इमारतीत घर मिळवण्यासाठी अनेक नागरिकांनी पैसे दिले आहेत. समितीने प्रामाणिकपणे काम केले तर मोठा घोटाळा समोर येईल. चौकशी समिती स्थापन झाली असली तरी ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहणार. - संदीप पाचंगे(विभाग अध्यक्ष) महाराष्ट्र नवनिर्माण सेना