डोंबिवली : कल्याण तालुक्यातील १४ गावांमध्ये पाणीप्रश्न बिकट असून त्याकडे प्रशासन आणि सत्ताधारी दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी शीळफाट्याजवळील दहिसर गावात आंदोलन करत जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर रास्ता रोको केला.
कल्याण तालुक्याच्या सीमेवर असलेली १४ गावे नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आली आहेत. या गावांत साधे पिण्याचे पाणीही पोहोचू शकलेले नाही. सत्ताधारी भाजपा-शिवसेना आणि प्रशासनाचे हे सपशेल अपयश आहे. त्यामुळे त्याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याण दौऱ्याच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई-पुणे जुना राष्ट्रीय महामार्ग रोखल्याचे पक्षाचे नेते वंडार पाटील यांनी सांगितले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूंकडील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. हा प्रश्न न सुटल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, बाबाजी पाटील, आदी उपस्थित होते.