कसारा : कसाऱ्यापासून सात किलोमीटर अंतरावर असलेले बिवलवाडी हे संपूर्ण आदिवासी वस्तीचे गाव. भातसा नदीचा उगम या गावाच्या पायथ्याशी होतो. मात्र, असे असूनही स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षे या गावात पिण्याच्या पाण्याची गैरसोय होती. ही समस्या सोडवण्यासाठी गावच्या खालच्या बाजूस असलेल्या ‘टोपाच्या बावडी’तून शक्तिशाली पंपाच्या मदतीने पाणी उचलून पाइपलाइनद्वारे ते गावात टाकीत आणून सोडायचे. नंतर ते नळाद्वारे घरोघरी सोडायचे अशी योजना ठरली. आठ ते दहा दिवसांत ३६ हजार लिटरची टाकी बांधून पूर्ण झाली. त्यानंतर शिक्षक महेश पवार, सहकारी शिक्षक शरद कांबळे, राम वायाळ यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन श्रमदानातून दीड किलोमीटर अंतरावरील विहिरीतून पाइपलाइन टाकली. चार दिवसांत हे काम पूर्ण केले. महावितरणने ततडीने वीजजोडणी केल्याने ७२ वर्षांनंतर पाणी घरात आले.
या गावात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी भेट दिली होती. त्यांनी या गावाला दत्तक घेत रस्ता व काही मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. दरवर्षी टंचाईग्रस्त गावांच्या यादीत बिवलवाडी पहिल्या क्रमांकवर असते. या गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यातही प्रशासनास अडचण होत होती. गाव टेकडीवर असल्याने टँकर थेट गावात पोहोचू शकत नसल्याने यावर उपाय काय तर गावाच्या खालच्या बाजूस हायवेजवळ अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील ‘टोपाची बावडी’ म्हणून विहीर आहे. त्यात टँकरने पाणी आणून ओतले जायचे. तिथून महिला हंडे घेऊन एक ते दीड किलोमीटर अंतर पार करून पाणी घरापर्यंत न्यायचे.
गावाच्या एका बाजूला मध्य रेल्वे तर दुसऱ्या बाजूला मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्ग, यामुळे बिवलवाडीत बोअरिंगसाठी परवानगी नव्हती. ही व्यथा शिक्षक पवार यांनी पालवी फाउंडेशनच्या अध्यक्षा कविता सुर्वे -कुशवाह यांच्या कानावर घातली व बिवलवाडीकरांसाठी एक आशेची पालवी फुटली. पालवी संस्थेने टोपाच्या विहिरीतून वाडीत पाणी कशा प्रकारे आणता येईल याबाबत सर्वेक्षण केले. पाणी गावापर्यंत नेण्यासाठी योजना राबवायची झाली तर ३ ते ४ लाख खर्च येणार होता. सुर्वे यांनी सहचारी फाउंडेशन, रोटरी क्लब मुंबई यांच्या मदतीने काम सुरू केले.
गावाच्या खालच्या बाजूस असणाऱ्या टोपाच्या विहिरीतून शक्तिशाली पंपाच्या मदतीने पाणी उचलायचे आणि पाइपलाइनद्वारे ते गावात मोठ्या साठवण टाकीत आणून सोडायचे आणि नंतर ते नळाद्वारे घरोघरी सोडायचे अशी योजना ठरली. श्रमदानातून पाइपलाइन टाकून गावात पाणी आले.