ठाणे : महाराष्ट्रातील पाचशे धरणे साफ करवून त्यातील गाळ काढून शेतात टाकला तर हे काळे सोने शेतकऱ्याचे उपन्न दुप्पट तिप्पट इतके वाढवू शकते. तसेच सगळ्या धरणांमधील गाळ निघाल्याने पाणी साठा आपोआप वाहून दुष्काळावर मात करणे सोपे होईल. पाण्यासाठी केला जाणारा जलयुक्त शिवार योजना हा कायमस्वरूपी उपाय नसून प्रथमोपचार आहे असे मत निवृत्त लेफ़्टनंट कर्नल व ग्रीन थम संस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. सुयश कला-क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित पंधराव्या व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प निवृत्त लष्करी सैनिकांचे सामाजिक योगदान व १९७१ साली लढाईचे अनुभव या विषयावरील व्याख्यानाने श्री सिद्धिविनायक मंदिराचे पटांगण येथे गुंफण्यात आले.
यावेळी सुरेश पाटील यांच्या स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवरायांनी केलेला जिहाद या पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाण्यासाठी भांडणे होतच आहेत. तशीच भांडणे राज्याराज्यात आणि गावागावांमध्ये देखील होत आहे. तरीही गेल्या अडुसष्ठ वर्षात राज्यातील जुन्या धरणातील गाळ काढण्याच्या कामाला कोणीही हात घातलेला नाही. महात्मा फुले यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी जेव्हा खडकवासला हे धारण बांधले तेव्हा त्याची क्षमता ही ४ टीएमसी होती. इतक्या वर्षात यातील गाळ न काढल्याने आत्ता या धरणाची पाणी क्षमता ही फक्त पावणेदोन टीएमसी इतकीच उरली आहे. त्यामुळे पुण्यामध्ये पाणीसमस्या निर्माण होत आहे. निवृत्त झाल्यावर आमच्या ग्रीन थम या संस्थेच्या माध्यमातून आत्तापर्यंत पंधरा लाख ट्रक गाळ काढण्यात आला असून यामुळे धरणामध्ये शून्य पूर्णांक वीस टीएमसी पाणी क्षमता वाढली आहे. काढलेला हा गाळ म्हणजेच काळे सोने शेतीला खत म्हणून घातल्यास शेतीचे उत्पन्न तर वाढेलच पण युरियाची शेतकऱ्याला द्याव्या लागणाऱ्या सरकारी सबसिडीचे कोट्यवधी रुपये वाचतील. मात्र यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करणे गरजेचे असून त्यासाठी सरकारचे आर्थिक पाठबळदेखील गरजेचे असल्याचे पाटील यांनी सांगितले. युद्धातील आठवणीविषयी बोलताना ते म्हणाले युद्ध करणे सोपे असते. युद्ध होऊ न देण्यासाठी खूप सय्यम लागतो. हल्ली सर्जिकल स्ट्राईक वर बोलले जात आहे मात्र सीमेवर असताना आम्हाला नेहमीच सर्जिकल स्ट्राईक करावा लागतो मात्र त्याच्या बातम्या केल्या जात नाहीत. आपल्याला कितीही वाटत असले तरी सध्याच्या परिस्थितीत आपण चीनचे काहीही बिघडवू शकत नाही. आठ दिवसाचे झालेले युद्ध आपल्या देशाच्या आर्थिक परिस्थितीला झेपणारे नाही. अलीकडे अनेक नेते सरळ बोलून मोकळे होतात पाकिस्तानको उडा देंगे. मात्र तुम्हाला बोलायला काय जाते. तुम्ही वर बसलेले असता. आमची जावन पोरे उडणार आहेत त्यामध्ये याचा विचार केला जात नाही. ह्या सैनिकांच्या जाण्याने त्यांच्या आया आणि विधवांवर झोपडपट्ट्यामध्ये राहण्याची वेळ येते, याचा विचार कोणीही करत नसल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली.