लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पश्चिमेतील खाडीलगतच्या परिसरात बुधवारी मध्यरात्रीनंतर पावसाचे पाणी शिरल्याने पूरस्थिती निर्माण झाली. देवीचा पाडा, कुंभारखाणपाडा, मोठागाव, अनमोलनगरी आदी परिसर पाण्याखाली गेल्याने तेथील रहिवाशांचे अतोनात नुकसान झाले. शेकडो कुटुंबीयांना दोरखंडाद्वारे बाहेर काढून नंतर बोटीने सुखरूप ठिकाणी हलविण्यात आले. दरम्यान, गुरुवारी दिवसभर पावसाचा जोर कमी असला तरी शहारांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले होते.
कल्याण खाडीला सतत येणाऱ्या मोठ्या भरतीमुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली. गुरुवारी भरती असल्याने सुमारे ४.७ मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या. त्यामुळे ते पाणी खाडीमार्गे शहरात शिरले. पश्चिमेतील कुंभारखाण पाडा, अनमोल नगरी, देवीचा पाडा येथील चाळी तसेच काही गृहसंकुलांचा तळ मजला पाण्याखाली होता. बराच वेळ ते पाणी थांबून राहिल्याने नागरिकांची चिंता वाढली. पाणी साचत असल्याने बारवी धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याच्या अफवांचे पीकही आले होते. परंतु, मनपाने त्याचे खंडन केले.
दरम्यान, पौर्णिमा शुक्रवारी लागणार असून, आणखी पावसाचा जोर वाढणार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेकांना महापालिकेच्या २० नंबर शाळेत, इमारतींच्या हॉलमध्ये तसेच काही रिकाम्या इमारतीत निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती.
---------------------