लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबई महापालिकेने आता १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी तत्काळ करण्याचे सुचीत केले आहे. त्याचा फटका आता ठाणे शहराला देखील बसणार आहे. ठाण्यातही आता ही कपात लागू करण्यात आली आहे. परंतु येत्या आठ दिवसात पाऊस झाला नाही तर मात्र ठाणे महापालिकेच्या माध्यमातून देखील संपूर्ण शहरासाठी पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती महापालिकेतील सुत्रंनी दिली.
मुंबई महापालिकेकडून ठाण्याला ६५ दशलक्ष पाणी पुरवठा केला जात आहे. हा पाणी पुरवठा शहरातील कोपरी, हाजुरी, गावदेवी, किसनगर आदी भागांना होत आहे. परंतु आता मुंबई महापालिकेने १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याने त्याचा फटका या भागांना निश्चितच बसणार आहे. आधीच कोपरीकरांचा पाण्यासाठी संघर्ष सुरु आहे. पाणी मिळत नाही म्हणून या भागातून अनेकवेळा आंदोलन देखील झालेली आहेत. त्यात आता पुन्हा वाढीव कपातीचा फटका या भागांना बसणार असल्याने नागरीक मेटाकुटीला येणार आहेत.
दरम्यान जून महिना संपत आला तरी देखील अद्यापही पाऊस म्हणावा तितका बरसला नाही. त्यात भातसा धरणात ४० टक्के तर बारवी धरणात देखील ३५ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. दुसरीकडे हवामान खात्याने देखील जुलै महिन्यात पाऊस कमीच पडणार असल्याचा अंदाज वर्तविला असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस होईल असा अंदाजही वर्तविला आहे. त्यामुळे जुलै महिन्यात पाऊस झाला नाही तर मात्र त्याचे विपरित परिणाम पाणी पुरवठय़ावर होणार असल्याचे दिसत आहे. सध्या मुंबई महापालिकेने १० टक्के पाणी कपात लागू केली असली तरी देखील आता ठाणो महापालिका देखील एक आठवडा पावसाची वाट बघणार आहे. किंबहुना इतर प्राधिकरण देखील याच पावसावर अवलंबून आहेत. एक आठवडय़ात पुरेसा पाऊस झाला नाही तर मात्र पाणी कपात केली जाणार असल्याची माहिती पालिका सुत्रंनी दिली आहे. त्यानुसार ही पाणी कपात कदाचित जुलैच्या आठवडय़ापासूनच लागू होईल असा अंदाजही वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार तसे झाल्यास संपूर्ण ठाणे शहरात रोजच्या रोज पाणी कपात केली जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
*पाणी संकट घोंगावत असतांना ठाणो महापालिकेने पाण्याचे नियोजन आखण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार शहरातील विहीरी आणि कुपनलिकांमधील पाण्याचा वापर हा इतर कामांसाठी कसा होऊ शकतो याची चाचपणी पालिकेने सुरु केली आहे. त्यानुसार याचे नियोजन आखण्यात आले आहे.