ठाणे : ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर या परिसरात लागू केलेली २० ते ३० टक्के पाणीकपात दिवाळी सणाकरिता तात्पुरती स्थगित केली होती. त्यामुळे या क्षेत्रातील पाण्याची चंगळ संपली असून पाणीकपात लागू होणार असल्याने संकट घोंगावू लागले आहे. जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रात विविध दिवशी ४८ तासांकरिता पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ठाणेकरांवर येत्या बुधवारपासूनच पाणीकपातीचे संकट घोंगावणार असल्याने पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. शहराला सध्या ४७० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. पाणीकपातीमुळे ठाणे शहरात बुधवारी तर कळवा-मुंब्य्रात गुरु वार आणि शुक्र वार असा दोन दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. ठाणे महापालिकेची स्वत:ची पाणीपुरवठा योजना, एमआयडीसी, जलसंपदा विभाग आणि स्टेम कंपनीकडील उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनाबाबत महापालिका आयुक्तांनी १ नोव्हेंबरपासून पाणीकपात लागू केली आहे. तर, एमआयडीसीनेदेखील दोन दिवस पाणीकपातीचे संकेत दिल्याने ठाणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. पुढील वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत पाणीकपात सहन करावी लागणार असल्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली.
जिल्ह्यात उद्यापासून पाणीकपात
By admin | Published: November 17, 2015 12:49 AM