भातसानगर : शहापूर तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच जटील होतो आहे. आता तर एक तलाव आणि चार गावे अशी परिस्थिती असून पाणी मिळणार कुणाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते आहे.तालुक्यातील साखरोली, कानविंदे, कळमगाव या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील एकमेव तलावातून पुणधे, आटगाव, साखरोली, कानविंदे आणि ११ पाड्यांत पाणीपुरवठा करण्यात येतो. अनेक वर्षांपासून हा पुरवठा सुरळीत होता. मात्र, दोन वर्षांपासून याच गावपाड्यांतील पाण्याचा प्रश्न गंभीर होतो आहे. तलावातील पाणीपातळी पाहता गावपाड्यांना किती आणि कसा पुरवठा होऊ शकतो, हाच मोठा प्रश्न आहे.साखरोली गावानजीक एक तलाव असून यातूनच आटगाव, कळमगाव, कानविंदे या मोठ्या लोकसंख्या असलेल्या गावांना पाणीपुरवठा केला जातो. याच तलावाच्या खाली कानविंदे, आटगाव आणि त्यातही खाली पुंध्येगावासाठीची विहीर बांधण्यात आली आहे. सध्या पाण्याची मागणी पाहता कळमगाव, कानविंदे आणि आटगाव यांच्यासाठी असणाऱ्या विहिरीचे दररोज पाणी लागते आहे. उपसा झाल्यानंतर या विहिरी पुन्हा भरण्यासाठी २४ तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे या विहिरींच्या खालच्या भागात असणाऱ्या पुंध्ये या गावासाठीच्या विहिरीत कमी पाणी जमा होत असल्याने या गावासाठी पाणी पुरवणे मुश्कील झाले असल्याने आता या गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. मात्र, यंदा पाण्याची बिकट अवस्था असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.हा तलाव अनेक वर्षांपूर्वीचा असून या तलावातील गाळ काढून त्याची उंची वाढवून गळती थांबवल्यास या गावांचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात येऊ शकतो. मात्र, त्यासाठी तीनही ग्रामपंचायतींनी एकत्र येण्याची गरज असल्याचे पुणधे ग्रामपंचायतीचे सदस्य रामकृष्ण निचिते यांनी सांगितले.
एका तलावातून चार गावांमध्ये पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 11:40 PM