- सदानंद नाईक उल्हासनगर : उपमहापौर भगवान भालेराव, प्रभाग समिती सभापती शुभांगी निकम यांचा प्रभाग असलेल्या आझाद चौक परिसरात जलवाहिन्या गळती लागून लाखो लिटर पाणी नालीत जात आहे. पाणी गळतीने रस्त्यांची दुरावस्था झाली असून पाणी गळती बाबत महापालिका पाणी पुरवठा विभागाला माहिती दिल्याची माहिती उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली आहे.
उल्हासनगर महापालिका प्रभाग क्र-७ मधून रिपाईचे भगवान भालेराव, त्यांच्या धर्मपत्नी अपेक्षा भालेराव, भाजपच्या लक्ष्मी सिंग व ओमी टीमच्या शुभांगी निकम असे चार नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी भगवान भालेराव हे उपमहापौर असून शुभांगी निकम प्रभाग समिती क्रं-२ च्या सभापती आहेत. प्रभागात झोपडपट्टीचा भाग ७० टक्के पेक्षा असून लहान मोठे कारखान्याची संख्याही लक्षणीय आहे. प्रभागात विकास कामे करण्याचा मोठा वाव असताना, प्रभाग अत्यंत गलिच्छ झाला आहे. जलवाहिनीच्या गळतीमुळे रस्त्यावर पाणीच पाणी असून रस्त्याची दुरावस्था झाली. गेल्या अनेक वर्षापासून असेच चित्र परिसराची असल्याची प्रतिक्रीया नागरिकांसह दुकानदारांनी दिली. जुन्या व शेकडो ठिकाणी गळती लागलेल्या जलवाहिनीची दुरस्ती महापालिका पाणीपुरवठा विभाग केंव्हा करते. याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेची स्वतःची पाणी पुरवठा योजना नसल्याने, पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. अनियमित पाणी पुरवठा, पाणी गळती व वितरणातील त्रुटींमुळे आजही अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली. गेल्या आठवड्यात मराठा सेक्शन परिसरातील महिलांना पाण्यासाठी दोनदा रस्त्यावर उतरावे लागले. तर इतर परिसरातील पाणी टंचाईची ओरड नागरिकांकडून होत आहे. समसमान पाणी पुरावठयासाठी महापालिकेने ५०० कोटीची पाणी वितरण योजना राबविली. मात्र ती अपूर्ण राहिली असून शहरात पुन्हा पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला असल्याची ओरड सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून होत आहे. उपमहापौर भगवान भालेराव यांनी प्रभागातील पाणी गळतीची समस्या पालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी व पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी बी सोनावणे यांना दिली. पाणी गळती व जलवाहिनी दुरस्तीचे काम करत नसल्याची नाराजी भालेराव यांनी व्यक्त केली.
लाखो लिटर पाणी नाल्यात
महापालिका प्रभाग क्रं-७ मधील बहुतांश ठिकाणच्या जलवाहिन्याला गळती लागली असून लाखो लिटर पाणी दररोज नालीत जात असल्याचे चित्र आहे. स्थानिक नगरसेवक व उपमहापौर भगवान भालेराव यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.