लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : केडीएमसीतील २७ गावांना चार-पाच वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तेथील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. कमी दाबामुळे दोन दिवसांतून एकदा पाणी येत असल्याने त्रस्त असलेल्या सोनारपाडा येथील साईधाम सोसायटीतील ९५ कुटुंबीयांना गुरुवारी केडीएमसीच्या डोंबिवलीतील ‘इ’ प्रभाग कार्यालयाच्या पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढला.
सोनारपाडा परिसरात केडीएमसीची बेकायदा नळजोडण्या तपासणी मोहीम सुरू होती. आधीच कमी दाबाने पाणी येत असल्याने या मोहिमेला साईधाम सोसायटीने विरोध केला. तसेच पाणीप्रश्न मनप सोडवू शकत नाही, मग अशा मोहिमेचा जनतेला काय फायदा असा जाब विचारला. त्यानंतर नागरिकांनी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी त्यांनी पाणीपट्टी घेता; मग पाणी प्रश्न सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा रहिवाशांनी दिला. तर, यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या मनसैनिकांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तर, सोनारपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मुकेश पाटील यांनी जनतेचा पाणी प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले.
दरम्यान, काही वेळाने मोर्चेकरी आपल्या घरी गेल्यावर त्यांच्या इमारतीजवळ मनपाचे कर्मचारी अनधिकृत नळजोडण्या तपासणीसाठी आले होते. कर्मचाऱ्यांनी या इमारतीची एक नळजोडणी तोडली. याचा राग आल्याने येथील रहिवासी संतप्त झाले होते. या मोहिमेला विरोध करत आधी नोटीस द्या, मग तापसणी करा, अशा शब्दांत त्यांनी कर्मचाऱ्यांना सुनावले. वातावरण तापू नये म्हणून कर्मचाऱ्यांनी तोडलेली नळजोडणी पुन्हा पूर्ववत करून दिली.
याबाबत पाणीपुरवठा उपअभियंता अनंत मतगुंडी यांना विचारले असता ते म्हणाले, एमआयडीसीकडूनच कमी दाबाने पाणीपुवठा केला जात आहे. प्रशासन याकडे लक्ष देऊन नागरिकांना त्रास होऊ नये, म्हणून काळजी घेणार आहे.
----------------