कल्याण : सलग दोन दिवसांची पाणीकपात आणि अत्यंत कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, यामुळे घराबाहेरील खदाणीतील पाणवठ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा रविवारी बुडून मृत्यू झाला. डोंबिवलीनजीकच्या भोपर गावात दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. प्रमिला (४०) आणि निखिल आजरा (१८) अशी मृतांची नावे असून, पाणीटंचाईमुळे झालेल्या या मृत्यूंबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.भोपर येथे राहणारी प्रमिला अन्य महिलांसमवेत कपडे धुण्यासाठी पाणवठ्यावर गेली होती. यावेळी तिच्यासोबत मुलगा निखिल हादेखील होता. कपडे धूत असताना, प्रमिलाचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. तिला पोहता येत नसल्याने ती बुडू लागली. तेथे उपस्थित असलेल्या अन्य महिलांनी मदतीसाठी हाका मारण्यास सुरुवात केली. आई पाण्यात पडल्याचे पाहताच तिला वाचवण्यासाठी निखिल यानेदेखील पाण्यात उडी मारली, परंतु त्यालाही पोहता येत नसल्याने तोही बुडू लागला. या घटनेची माहिती तत्काळ डोंबिवली अग्निशमन दल आणि मानपाडा पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना सर्वप्रथम निखिलचा मृतदेह हाती लागला, तर तळाला गाळात फसलेला प्रमिलाचा मृतदेह शोधण्यात तेथील स्थानिक रहिवासी आणि पट्टीचा पोहणारा आशीष गिजे या १५ वर्षीय मुलाला यश आले. या घटनेची नोंद मानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
पाणीटंचाई जीवावर बेतली!
By admin | Published: December 07, 2015 1:55 AM