बदलापूर : शहरात श्रीकृष्णनगर आपटेवाडी शिरगाव परिसरात पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र झाल्याने स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून सोमवारी काही काळ रास्ता रोको आंदोलन केले.
माजी नगरसेवक अविनाश मोरे यांनी नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे पाठपुरावा केला आहे. परंतु, मजीप्राने दखल न घेतल्याने अखेर नागरिकांना रस्त्यावर यावे लागले. नागरिकांनी सोमवारी कर्जत-बदलापूर रोडवर रास्ता रोको केला. तब्बल पंधरा ते वीस मिनिटे तो चालल्याने वाहतूक काही काळ खोळंबली होती. आमची मागणी मान्य केल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही असा पवित्रा घेतलेल्या नागरिकांनी रस्त्यावरच आपले ठाण मांडले होते. रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या अविनाश मोरे यांच्यासह नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करायचा तर सगळ्यांवर करा फक्त अविनाश मोरे यांच्यावर नको, अशी आक्रमक भूमिकादेखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. पाणीसमस्येवरून या भागातील वातावरण काही काळ तंग झाले होते.
----------////