ठाणे : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. शहरांसह गावखेड्यांतही पाऊस पडला नाही. मात्र, आतापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस उत्तमरीत्या बरसल्याने धरणांचा पाणीसाठा वाढला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात ९०.११ टक्के, तर बारवी धरणात ८९.९६ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे वर्षभराची पाणीसमस्या आता मिटली आहे. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत या दोन्ही धरणांत काही अंशी पाणीसाठा कमी आहे.
बारवी धरणात अवघा १८६९ मि.मी. पाऊस पडला आहे. यापेक्षा या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जास्त पाऊस पडला आहे. यामध्ये खानिवरे या पाणलोटात आतापर्यंत २६२३ मि.मी. पाऊस पडला आहे. कान्होळला २००१ मि.मी., पाटगावला १९२२ मि.मी. आणि ठाकूरवाडी या पाणलोटात २२२७ मि.मी. सरासरी पाऊस पडलेला आहे. यामुळे धरणांतील पाणीसाठा ८९.९६ टक्के झाला आहे. या बारवी धरणाची आजची पाणीपातळी १७.५४ मीटर नोंदली आहे. या धरणात मंगळवारी ३३८.८४० पैकी ३०४.८१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा तयार झाला आहे. या धरणाप्रमाणे भातसा धरणातही यंदा ९०.१३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी भातसामध्ये ९५.३७ टक्के साठा होता. या भातसा व बारवी धरणांच्या तुलनेत आंध्रा धरणात गेल्या वर्षाच्या तुलनेत आता जास्त पाणीसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी ६२.६६ टक्के असलेला पाणीसाठा यंदा ६८.५६ टक्के झाला आहे.