लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या दोन तालुक्यांना उन्हाळ्यात सर्वाधिक पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. मोठ्या प्रमाणात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. मात्र, ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने घेतलेल्या अथक प्रयत्नांमुळे अनेक गावपाड्यांची पाणीटंचाईमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. त्यात मुरबाड तालुक्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या व टँकरने पाणीपुरवठा होत असलेल्या गेटाची वाडी व चाफेवाडी येथे नवीन नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्यामुळे या दोन्ही पाड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली.
ठाणे जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून सर्वत्र ओळखला जातो. असे असले तरी, या जिल्ह्यातील अनेक गावे, पाडे आजही पाणीटंचाईच्या झळा सोसत आहेत. यामध्ये प्रामुख्याने शहापूर आणि मुरबाड या दोन्ही आदिवासीबहुल तालुक्यांचा समावेश आहे. या दोन्ही तालुक्यांतील अनेक गावे, पाड्यांना फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात होते. येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आजही पायपीट करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एच. एल. भस्मे यांनी शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील रखडलेल्या व बंद पडलेल्या योजनांचा आढावा घेतला. ज्या योजना कमी खर्चात कार्यान्वित करता येतील, त्या हाती घेऊन शहापूर आणि मुरबाड तालुक्यांतील अनेक योजना मार्गी लावल्या. मुरबाड तालुक्यातील पाटगाव ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या गेटाचीवाडी व चाफेवाडी या दोन पाड्यांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. २०१८ मध्ये या ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेतून विहीर खोलीकरण व नूतनीकरण केल्यानंतरही उन्हाळ्यात १५ एप्रिलनंतर या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. तसेच चाफेवाडी येथे दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता जाणवत होती; परंतु तेथे विहीर खोलीकरण व विंधन विहिरीवर सोलर पंप योजना राबविल्याने पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली. आता राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत गेटाचीवाडी व चाफेवाडी या दोन्ही ठिकाणी नवीन नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील एक हजार २०० लोकसंख्या असलेल्या पाड्यांवरील नागरिकांच्या चेहऱ्यावर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने आनंद दिसून आला.
.........
वाचली