टिटवाळा : कल्याण तालुक्यातील काळू नदीतील पाण्याची पातळी घटल्याने नदीपात्र कोरडे पडत चालले आहे. त्यामुळे नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या १० ते १२ गावांच्या पाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. फळेगाव, आरेली, मढ, रुंदे, म्हस्कळ व गुरवली या गावांना काळू नदीतील पाणी पुरवले जाते. परंतु, यंदाच्या कडक उन्हाळ्यात ओढे, नाले, तलाव, विहिरी आणि बोरवेलही आटल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ काळू नदीवरच धाव घेत आहेत. परिणामी नदीचे पात्रही कोरडे पडले आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या नळपाणीपुरवठा योजनेतून पुरवले जाणारे पाणी गढूळ व अशुद्ध येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यातच निम्मा जून उलटला तरी मौसमी पाऊस सुरू झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
काळू नदीवर टिटवाळा येथे केटी बंधारा आहे. त्यामुळे तेथे पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा असतो. केडीएमसीची पाणीयोजना याच पाण्यावर अवलंबून आहे. मात्र, पाण्याची पातळी खालावल्याने महापालिकेने या योजनेतून टिटवाळा शहराला पाणीपुरवठा करणे बंद केले आहे. तर दुसरीकडे बंधाऱ्याचे दरवाजेही लघुपाटबंधारे विभाग, कळवा यांनी काढले आहेत. यामुळे या नदीच्या पात्रात काही प्रमाणात असलेले पाणीही कमी झाले आहे. परिणामी गावांच्या पाणीपुरवठा योजनांना त्याचा फटका बसला आहे.नदीच्या पाण्यावर लगतच्या गावातील शेतकऱ्यांची गुरे पाणी पिण्यासाठी येतात. परंतु, आता त्यांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीच्या पाण्यावर काही प्रमाणावर येथील शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी भाजीपाली पिकवतात. पाण्याअभावी आता त्यांनीही भाजीपाला घेणे बंद केले आहे. या सर्व बाबींचा विचार करूनच लघुपाटबंधारे विभागाने बंधाºयाचे दरवाजे काढायला नको होते, असे ग्रामस्थ व शेतकºयांचे म्हणणे आहे.सरकारी नियमानुसार ३१ मेपर्यंत सर्वच बंधारे व धरणांचे दरवाजे उघडणे अथवा काढणे गरजेचे आहे. कारण अचानक पाऊस सुरू झाल्यास हे दरवाजे काढणे शक्य होत नाही. डेडलाइननुसारच आम्ही टिटवाळा येथील काळू नदीवरील केटी बंधाºयाचे दरवाजे काढले आहेत.- धनराज पाटील, उपअभियंता, लघुपाटबंधारे विभाग, कळवाटिटवाळा-गुरवलीजवळ काळू नदीवर असणाºया लघुपाटबंधारे विभागाच्या बंधाºयातून टिटवाळा शहर व पाच ते सहा गावांना पाणीयोजनांद्वारे पाणी पुरवले जाते. यंदा पाटबंधारे विभागाने २२ मे रोजी बंधाºयाचे दरवाजे काढल्याने काही प्रमाणात असलेले पाणीही वाहून गेले. त्यामुळे ग्रामस्थ, शेतकरी यांच्याबरोबरच गुरे ढोरे यांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.- नामदेव मेहेर, ग्रामस्थ, गुरवलीकाळू नदीच्या पाण्यावर आमच्या गावाची योजना अवलंबून आहे. परंतु, सध्या पाणी कमी झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस न पडल्यास पाणीयोजना बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावातील बोरवेल व विहिरीही आटल्या आहेत. पाऊस लांबणीवर पडल्यास गावात पाणीटंचाई जाणवू शकते.- प्रकाश भोईर, ग्रामस्थ, म्हस्कल