लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका असलेल्या शहरांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १५ दिवसांतून एकदा, अशी २४ तासांची पाणीकपात लागू केलेली आहे; परंतु आता ती रद्द करण्याच्या हालचाली जोर धरू लागल्या आहेत. होळीनंतर ती पूर्णपणे रद्द करून शहरांना त्यांचा आवश्यक तीन हजार ६२१ एमएलडी पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्यामुळे गृहिणींची पाणी समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.
पाणीकपात रद्द करण्याच्या दृष्टीने गुरुवारी बैठक निश्चित केली होती; पण काही अपरिहार्य कारणास्तव ती रद्द झाली; परंतु पुढील आठवड्यापासून म्हणजे होळीनंतर या पाणी कपातीच्या समस्येला आता पूर्णविराम मिळून ती कायमची रद्द करण्याचा निर्णय होऊ घातला आहे. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून महिन्यातून दोन वेळा २४ तासांची पाणी कपात लागू केली आहे. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे; पण त्याहीपेक्षा महापालिका, नगरपालिका आणि पाणीपुरवठा करणाऱ्या प्राधिकरणांकडून या कपातीच्या कालावधीला धरून दुरुस्तीची कामे काढल्यामुळे पाणी समस्या जिल्ह्यात गंभीर झाली आहे.
कपातीच्या नावाखाली महापालिका व पाणीपुरवठा करणाऱ्या प्राधिकरणाकडून पाइपलाइनची विविध कामे व दुरुस्ती हाती घेतली जात आहेत. त्यामुळे कपातीचा कालावधी संपलेला असतानाही नागरिकांना तीव्र पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे; पण आता ही कपातही रद्द होणार असल्यामुळे संबंधित महापालिका, नगरपालिकांना त्यांच्या मागणीस अनुसरून मुबलक पाणीपुरवठा सुरू होणार असल्याचे सुतोवाच पाटबंधारे विभागाने केले आहे. कारण आंध्रा व बारवी धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर आलेला आहे. त्यामुळे सध्याची लागू केलेली १५ दिवसातून एक वेळा २४ तासांची पाणीकपात आता रद्द करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय घेण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.
------------------