लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पिसवली-गोळवली प्रभागात २१ दिवसांपासून पाणीटंचाई भेडसावत आहे. महापालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांसह भाजपा नगरसेविका सुनीता खंडागळे व प्रभाग समिती सभापती सोनी अहिरे यांनी मंगळवारी दुपारी ४ वाजता महापालिका मुख्यालयात धाव घेतली. या वेळी त्यांनी तातडीने पाणीटंचाई दूर करण्याची मागणी केली. मात्र, कार्यकारी अभियंत्यांनी कामासाठी शटडाउन घ्यावा लागेल, त्यासाठी परवानगी घ्यावी लागेल, असे उत्तर देताच नगरसेविका व नागरिक भडकले.पिसवली प्रभागांत २१ दिवसांपासून पाणी येत नाही. मुळात पाणीसमस्या दोन वर्षांपासून भेडसावत आहे. या समस्येविषयी महापालिका व एमआयडीसी एकमेकांकडे केवळ बोट दाखवत आहेत. समस्या सुटत नसल्याने त्याचा त्रास येथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. इतके दिवस पाणी येत नसूनही महापालिकेला त्याचे काही सोयरसूतक नाही, असे रहिवासी अर्जुन सरोदे यांनी सांगितले.नगरसेविका खंडागळे म्हणाल्या, ‘प्रभागातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मी दीड वर्षापासून प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. २७ गावांमध्ये पिसवलीचा समावेश होता. मात्र, आता गावे महापालिकेत आली आहेत. या गावांना आजही एमआयडीसी पाणीपुरवठा करत आहे. नळजोडणी देण्यासाठी महापालिकेने एमआयडीसीकडून ना-हरकत दाखला आणायला सांगितला. मी स्वत: जाऊन हा दाखला आणल्यानंतर नळजोडणी दिली. मात्र, जेथून जोडणी दिली, त्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठाच होत नाही. याबाबत विचारणा केली असता एमआयडीसी व महापालिका एकमेकांकडे बोट दाखवून माझी दिशाभूल करत आहेत. परिणामी प्रभागातील १८ हजार नागरिक पाण्याविना आहेत. त्यामुळे महापालिकेवर मी धडक दिली आहे.’महापालिकेच्या प्रभाग समिती आय-९ अंतर्गत पिसवली-गोळवली प्रभाग येतो. या प्रभाग समितीच्या सभापती व बसपाच्या नगरसेविका सोनी अहिरे यांनीही खंडागळे यांना पाणीप्रश्नीसाठी साथ दिली आहे. प्रभागातील पाण्याची समस्या तातडीने सोडवावी, जोडणी देण्याचे काम उद्या सुरू करा. त्यासाठी तातडीने शटडाउन घ्या, अशी मागणी त्यांनी केली.दरम्यान, नुकतेच नांदविलीत महिला पाण्यासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. धरणात पुरेसा पाणीसाठा असताना कल्याण-डोंबिवलीत पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. पाणीपुरवठ्याचे नियोजन पालिका व एमआयडीसीकडे नाही, असेच यातून स्पष्ट होत आहे.सुरक्षारक्षकांनी प्रवेशद्वारावर रोखलेमहापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या सदस्यांनी नुकतेच आयुक्तांच्या दालनात खुर्ची फेको आंदोलन केले. त्यामुळे मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर अहिरे व खंडागळे यांना रोखण्यात आले.अहिरे व खंडागळे याही तशाच प्रकारे आंदोलन करू शकतात, या भीतीपोटी सुरक्षारक्षकांनी त्यांना प्रवेशद्वारावर रोखून धरले. त्या वेळी कार्यकारी अभियंता राजीव पाठक खाली आले. अहिरे, खंडागळे व नागरिकांनी त्यांना जाब विचारला.उद्याच शटडाउन घेण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, शटडाउनसाठी परवानगी घ्यावी लागले. जोडणी देण्याचे काम केले जाईल, असे आश्वासन पाठक यांनी दिले. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकेला प्रशासन जुमानत नाही हेच चित्र या घटनेतून पुन्हा समोर आले.
२१ दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 6:00 AM