लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : अंबरनाथ शहरात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईबाबत गुरुवारी खासदार श्रीकांत शिंदे आणि अंबरनाथ शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी ठाण्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता अरुण निरभवने यांची भेट घेतली. शहराची पाणीटंचाई दूर करण्याची मागणी केली. तसेच शहरातील पाणीप्रश्नाबाबत येत्या आठ दिवसांमध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे खासदार शिंदे यांनी स्पष्ट केले.
अंबरनाथ शहरातील पाणी समस्या दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. शहरात सध्या सुरू असलेला अनियमित पाणीपुरवठा, दूषित पाणीपुरवठा, शहरातील पाणीगळती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा नियोजनशून्य कारभार अशा अनेक समस्यांबाबत शिवसेनेच्या वतीने अनेकदा तक्रारी देऊन आंदोलनदेखील करण्यात आले होते. मात्र यानंतरही शहरातील पाणीपुरवठा नियमित होत नसल्याने शिवसेनेकडून मागील आठवड्यात शहरामध्ये चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. शिवसेनेच्या या इशाऱ्यानंतर ठाणे जिल्हा मजीप्रा अधीक्षक अभियंता अरुण निरभवने यांची खासदारांसमवेत भेट झाली. अनियमित होणारा पाणीपुरवठा सुरळीत करावा, तसेच जीर्ण झालेल्या पाइपलाइन बदलून नव्याने टाकण्यात याव्या, अशी विनंती केली. शहरात पाणीटंचाई दूर करण्यासाठी वाढवून पाणी घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून वेळोवेळी पाणीसमस्येबाबत पाठपुरावा होत आला आहे. मात्र आता मजीप्रा अधिकाऱ्यांसोबत झालेल्या भेटीनंतर अंबरनाथकरांचा पाणीप्रश्न मार्गी लागेल का? हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. याभेटी दरम्यान माजी नगरसेवक निखिल वाळेकर, उपशहरप्रमुख संभाजी कळमकर, मिलिंद गाण, शाखाप्रमुख अरविंद मालुसरे, श्रीनिवास वाल्मीकी, यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
----------------