अंबरनाथ : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असतानाच आता शहरातील पाणी समस्येकडे पुन्हा लक्ष देण्याची वेळ राजकारण्यांवर आली आहे. या निवडणुकीत पाणी समस्या हाच महत्वाचा मुद्दा राहिला आहे. निवडणुकीच्या काळात किमान पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा असताना शहरातील काही भागात पुन्हा कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. या समस्येवर तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात विरोधीपक्ष हे पाणी समस्येवर बोट ठेऊन सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचे काम करत आहेत. त्यामुळे निवडणूक काळात पाणीपुरवठा सुरळीत राहिल यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून काही भागात पुन्हा पाणी समस्या भेडसावण्यास सुरूवात झाली आहे. वांद्रापाडा, कमलाकरनगर, फुलेनगर, नालंदानगर या भागात पाणीसमस्या निर्माण झाली आहे. या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने अनेक नागरिकांना पाणी भरता येत नाही. तर काहींना मोटर लाऊन पाणी भरण्याची वेळ आली आहे. जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा वितरणात होत असलेल्या चुकीमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. तर या संदर्भात प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता तांत्रिक कारणे पुढे केली जातात.
अंबरनाथ पश्चिम भागात पाण्याची तीव्र टंचाई ही पूर्वीपासून होती. मात्र मागील सहा महिन्यात वितरणात सुधारणा करण्यात आल्याने समस्या जाणवत नव्हती. मात्र गेल्या महिन्याभरपाासून पुन्हा ही समस्या उफाळून आली आहे.तर गेल्या दोन दिवसांपासून समस्येत वाढ होताना दिसत आहे. निवडणूक प्रचारात व्यस्त असलेल्या राजकीय नेत्यांना नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यात वेळ घालवावा लागत आहे. तर ज्या भागात पाणी येत नाही त्यांची समजूत घालण्यात वेळ जात आहे.
ऐन निवडणुकीच्यावेळी संतापात अधिक भरविरोधी पक्ष या समस्येवर बोट ठेऊन पाणी समस्येलाच आपले निवडणुकीचे मुद्दे करुन प्रचार करत आहेत. आधीच पाण्याच्या समस्येमुळे शहर संतापलेले असताना आता निवडणुकीतही हाच प्रकार घडत असल्याने या संतापात भर पडली आहे.